नवी मुंबईत लपूनछपून कचरा टाकणाऱ्यांनो सावधान 

नवी मुंबईत लपूनछपून कचरा टाकणाऱ्यांनो सावधान 

नवी मुंबई : शहरातील पदपथ, मुख्य चौक आणि रस्त्यांच्या कोपऱ्यांवरील उघड्या ठिकाणी कचरा टाकण्यास महापालिकेने सक्त मनाई केली आहे; परंतु त्यानंतरही काही हॉटेलचालकांसह व्यावसायिक रात्रीच्या अंधारात किंवा गुपचूप अशा ठिकाणी कचरा टाकतात. शहराच्या आरोग्य आणि सौंदर्याला बाधा आणणाऱ्या अशा समाजकंटकांवर आता महापालिका सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवणार आहे. या प्रस्तावाला प्रायोगिक तत्त्वावर लवकरच मूर्त स्वरूप येणार असून तो यशस्वी झाल्यास त्याची शहरभर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 48 तास चित्रीकरणाची क्षमता या कॅमेऱ्यांची आहे. 

मस्त बातमी : नागपूरची संत्री मोठ्या प्रमाणात एपीएमसीमध्ये दाखल 

स्वच्छतेमुळे नवी मुंबई शहराचा लौकिक देशात आहे. स्वच्छता अभियानात तिसरा क्रमांक पटकावून तर त्यामध्ये भर घातली आहे. राज्यातही सलग पाच वर्षे अव्वल ठरले आहे. यंदा या मोहिमेत देशात पहिला क्रमांक पटकावण्याचे ध्येय ठेवले असून महापालिका घनकचरा विभागाने आत्तापासून त्यासाठी कंबर कसली आहे; परंतु रस्त्यावरील कचरा या मार्गात मोठा अडसर ठरण्याची शक्‍यता आहे. 

हे वाचा : मुंबई विद्यापीठाचा अंतिम वर्षाचा निकाल जाहीर

घनकचरा विभागाने दिलेल्या माहितीनुसार दैनंदिन वापरातून 100 किलोपेक्षा अधिक कचरा निघत असेल, तर संबंधित संस्थेला स्वतःच्या आवारातच खत निर्मितीच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत; परंतु बहुतांश संस्था खर्च वाचवण्यासाठी खतनिर्मितीच्या प्रकल्पाला बगल देऊन राजरोसपणे उघड्या जागांवर कचरा टाकत आहेत. बहुतांश उपनगरांतील मोक्‍याच्या जागेवर रात्री कचरा पडलेला असतो. हॉटेल आणि अन्य व्यावसायिक रस्ता, मोक्‍याच्या जागा अशा ठिकाणी कचरा टाकून पळ काढत असल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे शहरातील अशा जागा हेरून त्या ठिकाणी छुपे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची क्‍लृप्ती घनकचरा विभागाने शोधली आहे. याद्वारे कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. 

असे पकडले कचरा टाकणारे 
रस्त्यावरील उघड्या जागांवर कचरा टाकण्यास सक्त मनाई असतानाही काही महिन्यांपूर्वी सीबीडी सेक्‍टर 15 येथील क्रोमा शोरूमच्या पाठीमागे असलेल्या जागेत रात्रीच्या सुमारास कचऱ्याचे ढीग साचत होते. याबाबत महापालिकेने येथील हॉटेलचालक आणि व्यवसायिकांना विचारणा केली असता त्यांनी "तो मी नव्हेच,' असा पवित्रा घेतला होता. अखेर या कचरा टाकणाऱ्यांना पकडण्यासाठी महापालिकेने दोन सफाई कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन देऊन लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यांनी चोख कामगिरी करत रात्रीच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी हॉटेलमधील दोन मुलांना कचरा टाकताना पकडले होते. त्यानंतर संबंधित हॉटेलला नोटीस बजावून त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारामार्फत रात्री सातत्याने कचरा टाकण्यात येत असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे छुप्या पद्धतीने बसवले जाणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर कोपरखैरणेतील काही जागांवर हे कॅमेरे बसवले जात आहेत. बॅटरीवर चालणारे ते असून 48 तास रेकॉर्डिंग करण्याची क्षमता आहे. 48 तासांनंतर ते बदलून आधीच्या कॅमेऱ्यातील चित्रण तपासून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर शहरभर राबवण्यात येईल. 
- बाबासाहेब राजळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com