विश्वविक्रमी प्रयोगासाठी ‘हाऊसफुल्ल’ साथ

अभिनेते प्रशांत दामले त्यांच्या कारकिर्दीतील १२,५०० वा नाट्यप्रयोग आज ते मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सादर करणार
Actor Prashant Damle
Actor Prashant Damle

प्रत्येक प्रयोगाला ‘हाउसफुल्ल’ गर्दी खेचणारे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले आज (ता. ६) विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील १२,५०० वा नाट्यप्रयोग आज ते मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सादर करणार आहेत. या विश्वविक्रमानिमित्त त्यांची पत्नी गौरी दामले यांनी प्रशांत दामले यांच्या प्रवासाविषयी व्यक्त केलेल्या भावना.

रसिक प्रेक्षकहो,

सप्रेम नमस्कार! तुम्हाला अगदी आग्रहाचं निमंत्रण द्यायला हे पत्र लिहीत आहे. तशी तुम्हाला निमंत्रणाच्या औपचारिकतेची गरज नाही, हे महाराष्ट्रभर हाऊसफुल होणाऱ्या‍ प्रशांतच्या नाटकांवरुन उघड आहे. पण तरी, हा त्याच्या, खरंतर आमच्या, आयुष्यातला खूप महत्त्वाचा क्षण... तो तुमच्या साथीनेच साजरा व्हावा म्हणून हे पत्र! आज (ता. ६) प्रशांत आपला १२,५०० वा प्रयोग सादर करणार आहे.

‘इथपर्यंत कसे आलो, कळलंच नाही’ म्हणण्याचा भाबडेपणा नाही करणार. कोणत्याही गृहिणीच्या आयुष्यातली नवऱ्याच्या सहवासातली ३४ वर्षं म्हणजे प्रशांतचे हे १२,५०० प्रयोग आहेत! पण हे गणित मांडल्यावर वाटतं तेवढं प्रत्यक्षात जाणवलं नाही याचं श्रेय मात्र प्रशांतलाच आहे. मी अगदी साध्या घरात वाढलेली मुलगी.

प्रशांतचं महाविद्यालयीन स्पर्धांमधलं काम पाहिलं होतं. एका मैत्रिणीमुळे प्रशांतशी ओळख झाली आणि भेटी सुरु झाल्या. तेव्हा घरी टेलिफोन नव्हता. प्रशांत फोन करायचा आमच्या घराच्या वर राहणाऱ्‍या भाभींच्या फोनवर! त्या खाली सांगत आल्या की मी पटकन वर पळायचे! दोघांकडेही फार पैसे नव्हते त्यामुळे मनसोक्त गप्पा आणि दोघांत एखादी फ्रुटप्लेट वगैरे अशीच आमची ‘डेट’ असायची. ते दिवस खरंच खूप एन्जॉय केले.

यथावकाश लग्न झालं. मला आठवतं, २७ डिसेंबरला आमचं लग्न झालं. दुसऱ्या‍ दिवशी माहेरी पूजा होती. तिसऱ्‍या दिवशी, २९ डिसेंबरला प्रशांत जो सकाळी ८.४० ला गेला, तो रात्री १.४० ला आला! त्याने कितीही दार वाजवलं तरी मला कसली जाग येते! शेवटी प्रशांतच्या आईंनी दार उघडलं. त्यांनी कोणी मला काहीच वाटू दिलं नाही,

पण मी मात्र ठरवलं, त्याची घरी यायची कोणतीही वेळ असली तरी दार उघडायला, त्याच्यासोबत जेवायला जागं राहायचं. तो १२.३० ला येणार असला की १२.२० चा गजर लावून मी झोपू लागले. अर्थात, प्रशांतने यातल्या कशाचीच माझ्याकडून अपेक्षा केली नाही. आगळ्या-वेगळ्या संसारातही ‘संवाद’ चालू राहावा यासाठी ते खूप महत्त्वाचं ठरलं असं आत्ता जाणवतं.

प्रशांतला जसजशी ओळख मिळू लागली तसतसं आम्हीही लोकांच्या नजरेत येऊ लागलो. मी मुळातच हळवी. कोणी काहीही बोललं की मला वाईट वाटायचं. पण हळू हळू लोकांचं बोलणं मनावर घ्यायचं नाही, ते कोणत्या मानसिकतेने विचार करतात, कोणत्या परिस्थितीतून जातात आपल्याला माहीत नसतं, हे समजू लागलं.

या सगळ्यात प्रशांतच्या ‘प्रॅक्टिकल’ असण्याने मला खूप मदत झाली. ‘त्याच्या ओळखीपलिकडचं माझं अस्तित्व’ आणि ‘माझ्यामुळे जपली जाणारी त्याची प्रतिमा’ यातला सुवर्णमध्य साधायला अनुभवातून शिकले. या प्रवासात काही चुका झाल्या, काही चांगली माणसं जोडली गेली अन् चौकोनी कुटुंबापलिकडे आमचं एक कुटुंब तयार झालं.

प्रशांतचे सहकलाकार, बॅकस्टेज मंडळी, निर्माते यांच्याशी आमचे दोघांचेही उत्तम संबंध होतेच. कविता (मेढेकर) तर खरंतर प्रशांतची मैत्रीण, पण आता आमचीच दोस्ती जास्त आहे! या कुटुंबात दरवर्षी पडणारी मोठी भर म्हणजे आमचे टी-स्कूलचे विद्यार्थी! ‘नाटकातून आपल्याला मिळणारा आनंद नव्या पिढीलाही घ्यायला शिकवणं’ ही गोष्ट तो मनापासून करतो. हा पसारा वाढत गेला तसा तो जपणं, सांभाळणं हे कामही माझ्यावर आलं.

‘गौरी थिएटर्स’ची स्थापना ही त्यातलीच एक घटना! मी गंमतीत त्याला म्हणतेही, बघ, माझं नाव तुझ्यासाठी किती लकी ठरलं! तुम्ही सर्वांनी त्याच्या अनेक भूमिका पाहिल्यात. त्या त्याने किती चोख बजावल्या याची पावती तुमच्या टाळ्या, हशे आणि असंख्य प्रयोग देत आहेतच.

त्यापलीकडे मी प्रशांतने मुलगा, नवरा, वडील आणि आता आजोबा अशा सगळ्या भूमिका चोख निभावल्या. या सगळ्या भूमिकांसह आज तो १२,५०० प्रयोग पूर्ण करायच्या उंबरठ्यावर आहे. पूर्णवेळ नाटक करायचं हा त्यावेळीही धाडसाचा वाटणारा निर्णय केवळ तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे योग्य ठरला. तेव्हा, हा विक्रमाचा क्षण आमच्याइतकाच तुमचाही आहे! हा क्षण तुमच्यासोबत साजरा करण्याची मी आणि अर्थातच प्रशांतही, आतुरतेने वाट पहात आहोत! भेटू या!

(शब्दांकन : मुक्ता बाम)

प्रशांत मुळातच कुटुंबवत्सल आहे. त्यामुळे दोन्ही मुलींशी त्याचं अगदी सूत जुळलेलं असतं. घरात पाय ठेवताक्षणी तो ‘प्रशांत दामले’ न उरता ‘मुलींचा बाबा’ होऊन जायचा. त्यामुळे त्यांचं नातं कधीच दुरावलं नाही. सतत कामात असूनही मुलींना वाढवताना तो कायम माझ्यासोबत होता.

- सौ. गौरी प्रशांत दामले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com