esakal | व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन आहात? तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी

बोलून बातमी शोधा

WhatsApp-Payments
व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन आहात? तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी
sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबई: व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी मुंबई उच्च न्यायालयाने खूषखबर दिली आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केलेल्या वादग्रस्त पोस्टसाठी अॅडमिन जबाबदार असू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. जर एखादी व्यक्ती केवळ त्या ग्रुपचा अॅडमिन आहे आणि अन्य सदस्यांने टाकलेली पोस्ट त्याच्याशी संगनमत करुन टाकली नसेल तर त्या पोस्टसाठी अॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. केवळ अॅडमिन म्हणून एखादी व्यक्ती असेल आणि त्या पोस्टचा त्याच्याशी काहीही संबंध नसेल तर त्याच्यावर कारवाई होऊ शकत नाही, असे नागपूर खंडपीठाने म्हटले आहे.

गोंदिया पोलिस ठाण्यात एका ग्रुपच्या महिला सदस्याने अॅडमिन आणि एका सदस्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. ही फिर्याद रद्द करण्यासाठी अॅडमिनने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट टाकणाऱ्या सदस्याने संबंधित महिलेच्या विरोधात अपशब्द आणि वादग्रस्त आरोप केले होते. मात्र यावर अॅडमिनने यावर संबंधित सदस्यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि कारवाई करण्यास असर्मथता व्यक्त केली. तसेच त्याला ग्रुपमधून रिमूव्ह केले नाही आणि त्याने महिलेची माफी मागावी असे निर्देशही दिले नाही, असा आरोप महिलेने केला आहे.

हेही वाचा: चांगली बातमी: मुंबईच्या हवेसाठी लॉकडाऊन सकारात्मक

न्या झेड ए हक आणि न्या एम ए बोरकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. व्हॉट्सअॅप ग्रुप एडमिन केवळ सदस्यांना एड आणि रिमूव्ह करु शकतो, मात्र त्यांच्या पोस्टसाठी तो जबाबदार ठरु शकत नाही. कायदेशीर तरतुदीमध्ये असा उल्लेख नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

हेही वाचा: मुंबईतल्या चाळींमध्ये कशी आहे कोरोनाची परिस्थिती, जाणून घ्या

पोलिसांनी भादंवि कलम 354 ए (1)(4) अश्लील शेरेबाजी, 509 विनयभंग, 107 धमकी, आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 नुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात अॅडमिनच्या संगनमताने आणि पूर्वनियोजित कट आखून सदस्याने पोस्ट टाकल्या असे सिद्ध होत नाही. त्यामुळे कायद्याने अॅडमिनवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आणि फौजदारी गुन्हा रद्द करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

(संपादन- पूजा विचारे)

admin cannot responsible for controversial posts whatsApp group high court