माथेरानमध्‍ये माफक दरात उपचार

संग्रहित
संग्रहित

माथेरान : पर्यटकांच्या आवडत्या गिरिस्थानातील एकमेव रुग्णालयाला नवसंजीवनी देण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. येथील बी. जे. रुग्णालयासाठी सुमारे 10 लाखांची यंत्रोपकरणे खरेदी करण्यात आल्यामुळे रुग्णांना परवडणाऱ्या दरांत वैद्यकीय तपासणी आणि उपचारांची सोय झाली आहे. 

माथेरानमधील नगरपालिकेच्या बैरामजी जिजीभाई हॉस्पिटलमध्ये दररोज सरासरी 100 रुग्ण उपचार घेतात. या ब्रिटिशकालीन रुग्णालयात आवश्‍यक सोई-सुविधांची कमतरता होती. मधुमेहाच्या तपासणीसाठी साधी रक्तचाचणी मशीनही नव्हती. तापाच्या रुग्णालाही रक्ताच्या तपासणीसाठी माथेरानबाहेरील रुग्णालयांत जावे लागत होते, त्यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता.

या समस्येची दखल घेऊन नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, आरोग्य सभापती तथा उपनगराध्यक्ष आकाश चौधरी आणि नगरपालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी बी. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांशी चर्चा केली. त्यांनी रुग्णालयाला आवश्‍यक असलेल्या साहित्याची माहिती घेतली व त्याच्या खरेदीचा ठरावही नगरपालिकेत करण्यात आला, परंतु निधीची अडचण सतावत होती. अखेर कोकरे यांनी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मदतीने नगरपालिकेने 10 लाखांच्या साहित्य खरेदीला हिरवा कंदील दाखवला.

त्यानुसार माथेरान नगरपालिकेने सीएसआर फंडातून बी. जे. रुग्णालयासाठी 17 वैद्यकीय उपकरणे खरेदी केली आहेत. सर्टिफिकेशन इंजिनिअर्स इंटरनॅशनल लि. (सीबीडी- बेलापूर) या कंपनीला त्याचा ठेका देण्यात आला होता. त्यानुसार तीन पल्स ऑक्‍सिमीटर, नेब्युलायझर, तीन रक्तदाब उपकरणे, सक्‍शन फूट पंप, ऍडव्हान्स्ड डेंटल चेअर व उपकरणे, टीआयपी डिजिटल थर्मामीटर, बायोकेमेस्ट्री ऍनालायझर, फेटल डॉप्लर, इंटेन्सिव्ह केअर वॉर्मर, ऑटोस्कोप, डिलिव्हरी बेड, ऑटोमॅटिक हिमेटॉलॉजी ऍनालायझर आदी 35 उपकरणे येणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले. 

माथेरानमधील नागरिक आणि पर्यटकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या बी. जे. हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस डॉक्‍टर असूनही आवश्‍यक उपकरणांअभावी फक्त प्रथमोपचार केले जायचे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना पुढील उपचारासाठी माथेरानबाहेर जावे लागत होते. आता आधुनिक उपकरणे आल्यामुळे रुग्णांवर येथेच उपचार होतील. 
- प्रेरणा सावंत, नगराध्यक्ष, माथेरान 

बी. जे. हॉस्पिटलची प्राथमिक रुग्णालय ही ओळख पुसण्यासाठी आधुनिक यंत्रोपकरणे आणण्याचा निर्णय डॉक्‍टरांच्या संमतीने घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिल्यामुळे हे रुग्णालय आता परिपूर्ण होईल. सर्व रुग्णांवर येथेच उपचार केले जातील. 
- रामदास कोकरे, मुख्याधिकारी, माथेरान नगरपालिका 

बी. जे. रुग्णालयात वेगवेगळ्या आजारांचे निदान करण्यासाठी आवश्‍यक उपकरणे येणार असल्यामुळे आम्हा नागरिकांना आनंद झाला आहे. नगरपालिकेचा या निर्णयामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. 
- वीरेंद्र शिंदे, नागरिक, माथेरान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com