२० तासानंतर ज्वेलर्स मालकाने शोभा देशपांडे यांची मराठीतून मागितली माफी

पूजा विचारे
Friday, 9 October 2020

मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या ज्वेलर्सच्या मालकानं लेखिका शोभा देशपांडे यांची मराठीतून माफी मागितली आहे. मराठीतून बोलण्यास नकार दिल्यानंतर शोभा देशपांडे यांनी गेल्या २० तासांपासून दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन पुकारले होते.

मुंबईः मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या ज्वेलर्सच्या मालकानं लेखिका शोभा देशपांडे यांची मराठीतून माफी मागितली आहे. मराठीतून बोलण्यास नकार दिल्यानंतर शोभा देशपांडे यांनी गेल्या २० तासांपासून दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन पुकारले होते. अखेर त्यांच्या या लढ्याला यश आलेय. 

आज सकाळी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसंच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. पोलिसांनी ज्वेलर्सच्या मालकाला आंदोलनस्थळी घेऊन आले. मालकाने शोभा देशपांडे यांची मराठीतून माफी मागावी यासाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला. त्यानुसार मालकानं त्यांची मराठीतून माफी मागितली. मालकानं दुकानाचा परवाना दाखवावा या मागणीवर शोभा देशपांडे ठाम होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. 

हेही वाचाः  हायकोर्टाने सुनावलं! आता तपास कसा करायचा हे मीडिया सांगणार का?

नेमकं काय आहे प्रकरण?

मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्यानं या लेखिकेनं हे आंदोलनाचा पवित्रा उगारला. शोभा रजनीकांत देशपांडे असं या लेखिकेचं नाव आहे. मराठीत बोलण्याची मागणी केल्यानंतर दुकानदारानं अपमान केला. त्यानंतर लेखिका शोभा यांनी गुरुवारी दुपारपासून या ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाहेर रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं.

हे ज्वेलर्सचं दुकानं कुलाब्यात आहे. शोभा या सुद्धा कुलाब्यामध्ये राहतात.  दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू असं कुलाब्यासारख्या ससून डॉक भागात हे ज्वेलर्सचं दुकान आहे.  महावीर ज्वेलर्स असं या दुकानाचं नाव असून या ज्वेलर्सच्या दुकानादारानं मराठीत बोलण्यास नकार दिला. त्यानंतर त्यानं अरेरावी देखील केली आणि दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई करत पोलिसांना बोलवून अपमानित केलं. यामुळेच शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेरच ठिय्या मांडला होता.

अधिक वाचाः  सुशांत सिंह मृत्यू प्रकरणः पोलिसांची बदनामीसाठी बॉट अप्लिकेशनचा वापर

गुरुवारी दुपारी शोभा देशपांडे या महावीर ज्वेलर्समध्ये गेल्या होत्या. त्यावेळी दुकानदारानं त्यांच्याशी हिंदीत संवाद साधण्यास सुरुवात केली. मात्र त्यांनी त्यांना मराठीत बोला अशी विनंती केली. पण दुकानदारानं मराठीत बोलण्यास नकार देत दागिनं देण्यासही नकार दिला. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्यांना दुकानाच्या बाहेर काढलं. दुकानदार आणि पोलिसांनी दुकानाबाहेर काढल्यामुळे गुरुवारी पाच वाजल्यापासून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं.

After 20 hours jewelers owner apologized Writer Shobha Deshpande Marathi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 20 hours jewelers owner apologized Writer Shobha Deshpande Marathi