
कोरोना संक्रमणामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आस्थापने सायंकाळी सातनंतर बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. याचा फटका व्यापारीवर्गाला बसत असून नियम मोडल्यास होणाऱ्या कारवाईमुळे व्यापारी हैराण झाले आहेत. त्यातच सायंकाळी सातनंतर फेरीवाले रस्त्यावर आपले बस्तान मांडून व्यवसाय करतात. यामुळे स्थानक परिसरातील गर्दी सायंकाळी 7 नंतर किंचितही कमी होत नसून कोरोना संक्रमणाला आळा बसणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठाणे : कोरोना संक्रमणामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आस्थापने सायंकाळी सातनंतर बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. याचा फटका व्यापारीवर्गाला बसत असून नियम मोडल्यास होणाऱ्या कारवाईमुळे व्यापारी हैराण झाले आहेत. त्यातच सायंकाळी सातनंतर फेरीवाले रस्त्यावर आपले बस्तान मांडून व्यवसाय करतात. यामुळे स्थानक परिसरातील गर्दी सायंकाळी 7 नंतर किंचितही कमी होत नसून कोरोना संक्रमणाला आळा बसणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
क्लिक करा : मुंबईतील पहिली प्लाझ्मा बँक केईएममध्ये; नायर आणि सायन रुग्णालयांचाही प्रस्ताव
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सायंकाळी 7 नंतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सुरुवातीला काही व्यापारी नियमांचे उल्लंघन करीत असल्याने प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारत पाच हजारांचा दंड वसूल केला. दंडाच्या भीतीने व्यापारीवर्गाने सातच्या दरम्यान दुकानाचे शटर खाली करण्यास सुरुवात केली; मात्र रस्त्यावरील फेरीवाले सातनंतर पुन्हा बस्तान मांडत असल्याचे चित्र डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात दिसून येते.
पालिकेचे कर्मचारी कारवाईस येत असल्याचा सुगावा लागताच फेरीवाले गल्लीबोळात आपले सामान लपवून ठेवतात. कर्मचारी जाताच पुन्हा रस्त्यावर व्यवसाय मांडतात. त्यामुळे नोकरदारवर्ग कामावरून घरी जाताना फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करत असल्याने कर भरून पालिकेला आर्थिक हातभार लावणारे व्यापारी पालिकेविरोधात संताप व्यक्त करीत आहे. महापालिकेच्या नियमांच्या बंधनामुळे अर्थचक्राला खीळ बसत असल्याचे व्यापारीवर्गाचे म्हणणे आहे.
दुकानांवर कारवाई करत दंडाची रक्कम वसूल केली जाते. फेरीवाल्यांवर मात्र दंडात्मक कारवाई होत नाही. त्यामुळे सातनंतर ते बिनधास्त रस्त्यावर असतात. दुकाने बंद असल्याने ग्राहकही त्यांच्याकडून खरेदी करतात. पालिका प्रशासनाने सर्वांचा विचार करून दुकानांची वेळ रात्री 10 पर्यंत करावी.
- हितेन जोशी, व्यापारी, डोंबिवली
ठाण्यात दुकानांना रात्री 9 पर्यंत परवानगी देण्याची मागणी
दसरा, दिवाळी यासारखे सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत केले जात आहेत. ठाणे शहरातही आर्थिक व्यवहार ठप्प पडल्याने जनजीवन सुरळीत होण्यासाठी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ठाणे व्यापार उद्योग महासंघाच्या (ठाम) च्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भात सोमवारी महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्यापाऱ्यांना भेटण्याची वेळ दिलेली आहे. त्यानुसार यातून सुर्वण मध्य काढला जाईल, अशी आशा "ठाम'चे उपाध्यक्ष आशीष शिरसाठ यांनी व्यक्त केली आहे.
आमच्यावरच अन्याय कशासाठी?
ठाण्यात आजही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तरीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सर्व व्यवहार सुरू आहेत. मधल्या काळात सम-विषम तारखेला दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी ठाण्यातील दुकानदारांना दिली. त्यात हॉटेल, बार व्यावसिकांना देखील पालिकेने थेट 11.30 पर्यंत आपले व्यावसाय सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. मग ठाण्यातील दुकानदारांवर अन्याय कशासाठी, असा सवाल देखील केला जात आहे.
---------------------------
(संपादन : प्रणीत पवार)