आज मोनिकाचे बाबा हवे होते!; हात प्रत्यारोपणानंतर आई कविता मोरे यांच्या भावना झाल्या अनावर 

भाग्यश्री भुवड
Sunday, 30 August 2020

2014 साली घाटकोपर येथील रेल्वे दुर्घटनेत मोनिकाला दोन्ही हात गमवावे लागले होते. मोनिकाला हात मिळण्यासाठी तिच्या बाबांनी खूप प्रयत्न केले होते.

मुंबई : मोनिकाला पुन्हा हात मिळाले हे पाहण्यासाठी आज तिचे बाबा हवे होते, तिला हात मिळण्यासाठी तिच्या बाबांनी खूप प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलेय, अशी भावना व्यक्त केलीय मोनिकाची आई कविता मोरे यांनी. 2014 साली घाटकोपर येथे रेल्वे दुर्घटनेत 24 वर्षीय मोनिका मोरे हिला दोन्ही हात गमवावे लागले होते. शुक्रवारी (ता.28) मोनिका हिच्या हातांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. सलग 15 तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर चेन्नई येथील ब्रेनडेड रुग्णाचे हात मोनिकाला बसवण्यात आले. 

मुंबईकरांनो सावधान! कोरोना नियंत्रणात आला असला तरी हायरिस्कमधील रुग्णांच्या संख्येत होतेय मोठी वाढ

2014 साली घाटकोपर येथील रेल्वे दुर्घटनेत मोनिकाला दोन्ही हात गमवावे लागले होते. मोनिकाला हात मिळण्यासाठी तिच्या बाबांनी खूप प्रयत्न केले होते. अनेक रुग्णालयांत फिरले, अनेक तज्ज्ञांशी सल्लामसलत केली. शिवाय ग्लोबल रुग्णालयात तिच्या नावाची नोंद करत शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चाबाबतही मोनिकाच्या वडिलांनी तरतूद केली होती. त्यांनी स्वत:चा किडनीचा आजार बाजूला सारत केवळ आपल्या मुलीला हात मिळावेत यासाठी प्रयत्न केले. मात्र, जेव्हा मोनिकाला पुन्हा हात मिळाले ते पाहण्यासाठी तिचे बाबा या जगात नाहीत, त्याचे दुःख आजही मनाला चटका लावून जाते, हे सांगताना मोनिकाच्या आई कविता मोरे यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. 

सीबीआय चौकशीनंतर रिया चक्रवर्ती पोलिस ठाण्यात का गेली? भाजप आमदाराने केला सवाल

मुख्य सर्जन डॉ. नीलेश सातभाई म्हणाले की, ही शस्त्रक्रिया आम्हाला वेगाने पूर्ण करण्याचे आव्हान होते. कारण ब्रेनडेड व्यक्तीचे हात किमान 10 तास जपून ठेवता येतात. त्यानंतर उशीर झाल्यास अडचणी निर्माण झाल्या असत्या. त्यामुळे आम्हाला लवकर शस्त्रक्रिया करावी लागली. त्याशिवाय प्रत्यारोपणाच्या बाबतीत कोरोनामुळे संक्रमण होण्याची भीती जास्त असते. त्यामुळे मोनिका पुढील दोन आठवडे अतिदक्षता विभागातच राहणार आहे. त्यानंतर पुन्हा दोन आठवडे विलगीकरण कक्षात तिला ठेवले जाईल. दरम्यान, तिच्या शरीराने हात स्वीकारून त्यांचे कार्य सामान्य व्हायला वेळ द्यावा लागेल. त्यामुळे हातांची हालचाल करायला वेळ जाईल. 

गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक उपक्रमांवर संकट, कोरोनाचा असाही झालाय परिणाम

काळजी आणि आशा दोन्ही भावना 
हाताच्या प्रत्यारोपणानंतर मोनिका पुढचे काही आठवडे अतिदक्षता विभागात राहणार आहे. तिला संसर्ग होऊ नये म्हणून तिची लगेच भेट होणार नाही आहे. त्यामुळे किमान पुढचे दोन आठवडे तरी तिला पाहता येणार नाही. त्यामुळे थोडी काळजी आहे; पण एक सकारात्मक बाजूही आहे की, ती आता सर्वसामान्य आयुष्य जगू शकेल. जोपर्यंत तिचे हात हालचाल करत नाहीत, तोपर्यंत तिची खूप जास्त काळजी घ्यावी लागेल, असेही कविता मोरे यांनी सांगितले. 
-- 
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after hand replacement surgery on monika more, today her father would be happpy says her mother