हात प्रत्यारोपणानंतर मोनिका मोरेला डिस्चार्ज, पश्चिम भारतातील पहिले यशस्वी हात प्रत्यारोपण

भाग्यश्री भुवड
Saturday, 26 September 2020

मोनिकाला आज 4 आठवडयानंतर मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे.

मुंबई 26 : मुंबईतील 24 वर्षीय 'मोनिका मोरे'ला हात प्रत्यारोपणानंतर आज ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 28 ऑगस्ट या दिवशी मोनिकावर दोन्ही  हातांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. मुंबई आणि पश्चिम भारतातील ही पहिलीच हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे.

मोनिकाच्या संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च 36 लाख रुपये एवढा आला असून मोनिकाच्या मदतीसाठी अनेक दाते ही पुढे आले आहेत. डिस्चार्ज दिल्यानंतर तिला घरी काही शारिरीक व्यायाम करायला शिकवण्यात आले आहे. शिवाय, तिच्या आईला ही याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्यारोपण झाल्यानंतर मोनिकाच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून, तिला काही दिवस एक आठवडा आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर तिला एका स्पेशल रूममध्ये ठेवण्यात आले होते. जिथे तिचे मनोरंजन म्हणून टीव्हीही लावण्यात आला.

महत्त्वाची बातमी : गुंगारा देत दीपिका पोहोचली NCB कार्यालयात; पण दीपिका होती कुठे?

संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घेणे महत्वाचे- 

हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे मोनिकाला संसर्गाची शक्यता असल्याने कुटुंबियांना तिला भेटायला देता येत नव्हते. अशा स्थितीत कुटुंब तिच्याशी फोन व व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते. ”तसेच संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी तिला घरीही काही महिने वेगळे ठेवणे गरजेचे आहे. तसेच, कोरोना काळात पुर्णता काळजी घेत कोणत्याही सामाजिक अथवा गर्दीच्या वेळी बाहेर जाण्यास मनाई आहे. 

मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई म्हणाले की, ‘‘हात मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मोनिकाच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण रखडले होते. पण आता हात मिळाल्याने तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हातांचे प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. या शस्त्रक्रियेनंतर मोनिकाला प्रत्यारोपण अतिदक्षता विभागात एका वेगळ्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. तसेच तिची काळजी घेण्यासाठी विलगीकरणासह एका नर्सची नियुक्ती देखरेखीसाठी करण्याची आवश्यकता होती. दोन्ही हातांना नियमित मलमपट्टी करण्यात आली. रूग्ण प्रत्यारोपणाच्या तिस-या दिवशी ती आपल्या खांद्याचा आधार घेऊन चालू व बसू लागली. याशिवाय दिवसातून दोनदा तिला फिजिओथेरपी दिली जात होती. हातांच्या हाडांना आधार मिळावा, यासाठी हाताच्या कोपऱ्यापर्यंत प्लास्टर करण्यात आला आहे.”

महत्त्वाची बातमी बायको उचलतेय खर्च, खटला लढवण्यासाठी विकावे लागतायत दागिने, अनिल अंबानींचा कोर्टात दावा

डॉ. सातभाई पुढे म्हणाले, “येत्या काही आठवड्यांत तिला कोपर हलवायला सांगितले जाईल. याशिवाय हात आणि बोटांनी 3-4 महिन्यांनंतर हालचाल सुरू होणे अपेक्षित आहे. तिच्या हाताचे स्नायूतील टिश्य आणि हाड तोपर्यत बरे होतील. रूग्णाला या काळात आपल्या दैनंदिन कार्य़ासाठी मदत घ्यावी लागेल. पण, एकदा तिच्या हातांची हालचाल आणि व्यायाम व फिजिओथेरपीव्दारे ती लवकरच अधिक अधिक स्वावलंबी होईल. तिच्या हातांच्या रिकव्हरीसाठी साधारण एक ते दिड वर्ष लागेल. हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला आता चार आठवडे पूर्ण झाले असून मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिच्या फक्त गोळ्या सुरू आहेत. रूग्ण खुप चांगल्या प्रकारे पुर्ववत होत असून उपचारांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे. हे लक्षात घेऊन मोनिकाला आता घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घरी गेल्यावरील तिला दररोज व्यायाम व फिजिथेरपी घेणं गरजेचं आहे.”

मोनिकाला आज 4 आठवडयानंतर मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे. तिच्यावर 28 आँगस्ट रोजी तब्बल 16 तास दोन्ही हातांच्या यशस्वी प्रत्यारोपण आणि खुप चांगली सुधारणा झाली असून ती पुढील नवीन आयुष्यासह सहा वर्षानंतर पुन्हा स्वांवलंबन जीवनाचा प्रयत्न करणार आहे. 

दरम्यान, आपल्याला हात मिळाल्याचा आणि त्याचे यशस्वी प्रत्यारोपण झाल्याचा मोनिका ला अत्यंत आनंद झाला आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया आणि उपचार करणार्या डाॅक्टरांचे तिने आभार व्यक्त केले आहेत.

after hands transplant monica more gets discharge from hospital

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after hands transplant monica more gets discharge from hospital