राम कदम यांच्यानंतर 'या' आमदाराचीही दहीहंडी रद्द

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 22 June 2020

मुंबईमध्ये प्रो गोविंदा ही संकल्पना संस्कृती युवा प्रतिष्ठानने आणली. या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन तरुण पुढे येत असून हंडीत तब्बल 9 थरांचा जागतिक विक्रम झाला त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे. त्यामुळे दरवर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी अतिशय उत्साहात साजरी होते.

 

मुंबई- सध्या देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. राज्यासह मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग खूप महत्त्वाचं आहे. या व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून केले जात आहे. अशातच मुंबईतही सर्वांत प्रसिद्ध उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि दहीहंडी. मात्र कोरोनाचं सावट लक्षात घेता गणेशोत्सवा पाठोपाठच दहीहंडी उत्सव रद्द होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सरकारचा निर्णय येण्याआधी भाजप नेते राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहीहंडीला होणारी मोठी गर्दी पाहता त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यांच्यानंतर आता  संस्कृती युवा प्रतिष्ठानची प्रसिध्द दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

...अजूनही 9 लाख रायगडकर संपर्क क्षेत्राबाहेर! निसर्ग चक्रीवादळाचा फटका

या दहीहंडी पथकाचे अध्यक्ष, आमदार प्रताप सरनाईक आणि सचिव तसेच संयोजक पूर्वेश सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यंदा आपल्यापुढे कोरोनाचे मोठे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये प्रो गोविंदा ही संकल्पना संस्कृती युवा प्रतिष्ठानने आणली. या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन तरुण पुढे येत असून हंडीत तब्बल 9 थरांचा जागतिक विक्रम झाला त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे. त्यामुळे दरवर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी अतिशय उत्साहात साजरी होते.

दरवर्षी दहीहंडीचा सण मुंबईत अतिशय उत्साहानं साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे हा सण साजरा करणे शक्य होणार नाही. दहीहंडी उत्सव पाहणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे या सणाच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगसह विविध नियमांचे पालन होणार नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे आहे.

कोरोनाबाॅम्ब ठरलेल्या धारावीतून गुड न्यूज

राम कदम यांचीही दहीहंडी रद्द 

राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. मुंबई ठाण्यामध्ये काही मोठ्या दहीहंड्यांचे आयोजित केले जात असते. घाटकोपर परिसरात राम कदम यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन केलं जातं. तसंच अनेक पथकं या ठिकाणी हंडी फोडण्यासाठी येत असतात. हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी हजारोंनी जनसमुदाय रस्त्यावर उतरतो. यामुळेच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राम कदम यांनी हा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

कोरोनाचे संकट पाहता आणि दहीहंडीला होणारी हजारो लोकांची गर्दी लक्षात घेता घाटकोपला होणारी देशातील सर्वांत मोठी दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे', असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.

आरे वसाहतीत मेट्रो कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा

घाटकोपरमध्ये राम कदम यांची दहीहंडी खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला बॉलिवूडचे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या ठिकाणी सेलिब्रिटींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Ram Kadam, this MLA's Dahihandi was also canceled