...अजूनही 9 लाख रायगडकर संपर्क क्षेत्राबाहेर! निसर्ग चक्रीवादळाचा फटका

...अजूनही 9 लाख रायगडकर संपर्क क्षेत्राबाहेर! निसर्ग'चा फटका
...अजूनही 9 लाख रायगडकर संपर्क क्षेत्राबाहेर! निसर्ग'चा फटका

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळात मोबाईल नेटवर्कच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या वादळात 512 टॉवर्स नादुरुस्त झाल्याने रायगडमधील विविध कंपन्यांचे साधारण 9 लाख ग्राहक अद्यापही नॉट रीचेबल आहेत. विस्कळित झालेली संपर्क यंत्रणा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच केवळ बीएसएनएलमुळे बँका, सरकारी कार्यालयातील संपर्क यंत्रणा पूर्वपदावर आली आहे. मात्र, खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये सातत्याने व्यत्यय येत असल्याने ग्राहक रीचेबल होण्याची वाट बघत आहे.

निसर्ग चक्रीवादळात सरकारच्या बीएसएनएल या नेटवर्क कंपनीसह जीओ, आयडिया-व्होडाफोन, एअरटेल यांसारख्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दक्षिण रायगडमधील ग्रामीण भागात वीज नसल्याने तर येथील मोबाईल टॉवरसाठी जनरेटरद्वारे वीजपुरवठा करावा लागत आहे. विजेअभावी मोबाईल कंपन्यांना अनेक अडचणी येत असल्याने नेटवर्कमध्ये सातत्याने व्यत्यय येत आहे. यामुळे जिल्ह्यातील 9 लाख ग्राहक नॉट रीचेबल झाले आहेत.

वादळानंतर मदतकार्य पोहचवण्यात बँका, सरकारी कार्यालयांमधील इंटरनेट सुविधा सुरू करण्याची जबाबदारी बीएसएनएलवर टाकण्यात आली होती. हे काम 17 दिवसांनंतर जवळजवळ 95 टक्के पूर्ण केल्याचा दावा बीएसएनएलकडून केला जात आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये बीएसएनएलला संपर्क यंत्रणा सुरू ठेवता आल्याने वादळाचा सर्वांत जास्त फटका बसलेल्या भागात तत्काळ मदत पोहचवणे प्रशासनाला शक्‍य झाले आहे. निसर्गच्या आपत्तीमध्ये धावून आल्याने बीएसएनएल नेटवर्कवर ग्राहकांचा विश्वास वाढत आहे. 

अन्य ग्राहकांना बीएसएनएलचा आधार
वादळानंतर तीन दिवस 70 टक्के रायगड जिल्हा नॉट रिचेबल होता. अशा वेळी बीएसएनएलने आयटीआर (इन्ट्रा सर्कल रोमिंग पॅक) सुविधा सुरू करून इतर नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांसाठी बीएसएनएल नेटवर्क वापरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. या सुविधेचा 80 हजार मोबाईल ग्राहकांनी लाभ घेतला. याचा मोबदला बीएसएनएल कंपनीने घेतलेला नाही.

चक्रीवादळात संपर्क यंत्रणा विस्कळित होणार नाही, याची खबरदारी घेतली होती. यासाठी जनरेटर, दुरुस्तीसाठी मनुष्यबळ ठेवले होते. त्यामुळे वादळातही अलिबाग, रोहा, पेण येथे बीएसएनएलची सेवा सुरू होती. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने टप्प्याटप्प्याने नेटवर्क सुरू करण्यात यश आले. ज्या भागात वीज नाही, तेथील नेटवर्क बंद आहे. 
- दिलीप कोहडकर, अधीक्षक अभियंता, बीएसएनएल रायगड. 

बेभरवशाची नेटवर्क कंपनी म्हणून बीएसएनएल कंपनीचा उल्लेख केला जातो. खासगी कंपन्यांनी दूरसंचार क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर या कंपनीचा कारभार ढिसाळ होत गेला. अनेकांनी लँडलाईन सेवाच बंद केली. मात्र, निसर्ग वादळात बीएसएनएलने सेवा सुरू करून सुखद धक्का दिला.
- संदेश पाटील, बीएसएनएल उपभोक्ता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com