शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देऊ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

बी. जी. कोळसे पाटील : रिलायन्स नागोठणे कंपनीसमोर आंदोलन 

 नागोठणे : आमची प्रत्येक लढाई संविधानिक, कायदेशीर, अहिंसा व शांततेच्या मार्गाने असते. मी पोलिस, तुरुंग व मरणाला घाबरत नाही. जनहित व गोरगरीब, सर्वसामान्यांच्या हिताचे ध्येय ठेऊन न्यायाधीशपदासारखी नोकरी सोडून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आजवर निःस्वार्थपणे लढे दिले. माझ्या संपूर्ण आयुष्यात एकही लढाई हरलो नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याने लढत आहोत. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देत प्रकल्पग्रस्त व कामगारांना न्याय मिळवून देणारच, असा दृढविश्वास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केला. 

महत्वाची बातमी नवी मुंबईत महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजप असं करतंय प्लॅनिंग

रिलायन्स नागोठणे कंपनीविरोधात लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने रिलायन्स नागोठणे कंपनीच्या कुहिरे प्रवेशद्वारासमोर शनिवारी (ता. 14) सायंकाळी साडेसहा वाजता जाहीर सभा घेऊन आंदोलन केले. या वेळी प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, कंत्राटी व कायम कामगार, निवृत्त कामगार, बेरोजगार तरुण यांना मार्गदर्शन करताना कोळसे पाटील बोलत होते. या वेळी प्रकल्पग्रस्तांनी "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची', "आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा', "कोण म्हणतोय देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाही' अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या वेळी संघटनेचे राजेंद्र गायकवाड, शशांक हिरे, ऍड. संतोष म्हस्के, गंगाराम मिनमीने, प्रबोधिनी कुथे, पुष्पा दाभाडे आदी पदाधिकाऱ्यांसह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा आजपासून तुमचा EMI होणार कमी

रिलायन्स (पूर्वीची आयपीसीएल) कंपनीने स्थानिक पंचक्रोशीतील 1237 प्रमाणपत्रधारकांपैकी 636 जणांना कायमस्वरूपी कामावर रुजू करून घेतले. व उर्वरित 601 जणांना मात्र नोकरीपासून वंचित ठेवल्याचा आरोप करत राज्यकर्ते व शासकीय अधिकारी यांनी आमच्यावर दारिद्य्र व भूकबळीची वेळ आणल्याचे सांगत प्रकल्पग्रस्तांनी या वेळी संताप व्यक्त केला. या वेळी दोन वेळा जेल भरो आंदोलन व आत्मदहनाचादेखील प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. 

ही बातमी वाचली का.. मोबाईल कॉलिंग 25 टक्क्यांनी महागणार

36 वर्षांचा कालावधी उलटून जाण्याची वेळ आली, तरी भूमिहीन प्रमाणपत्रधारकांना न्याय मिळाला नाही, जोपर्यंत आम्हाला नोकरीत सामावून घेतले जाणार नाही, तोपर्यंत आमचा लढा संविधानिक मार्गाने सुरूच राहील असे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिस उपविभागीय अधिकारी किरण सूर्यवंशी व पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Agitations before the Reliance Nagothane company


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitations before the Reliance Nagothane company