Air India : ‘एअर इंडिया’साठी १५ हजार कोटींचे कर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air India

Air India : ‘एअर इंडिया’साठी १५ हजार कोटींचे कर्ज

मुंबई : एअर इंडियासाठी १५ हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवल उभारण्याकरता टाटा समूह विविध बँकांकडून कर्ज मिळवण्याबाबत चर्चा करत आहे. टाटा समूहाने गेल्या वर्षी सरकारकडून एअर इंडिया खरेदी केली होती. तिच्या पुनरुज्जीवनासाठी टाटा समूह जोरदार प्रयत्न करत आहे. कंपनीच्या दैनंदिन कामकाजासह तोटा भरून काढण्यासाठी, विमाने सुस्थितीत आणण्यासह अनेक कामांसाठी ही कर्जाची रक्कम वापरण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या कर्जाची मुदत तीन वर्षांची असेल आणि वार्षिक ७.५ ते आठ टक्क्यांच्या दरम्यान त्याच्या व्याजाचा दर असेल, असे सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षी, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनी ४.२५ टक्के दराने टाटा सन्स या टाटा समूहातील प्रमुख कंपनीला २३ हजार कोटी रुपयांचे विनातारण कर्ज दिले होते. या कर्जाचे नूतनीकरण येत्या जानेवारी अखेर करावयाचे आहे. बँकेच्या काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वाढते व्याजदर आणि प्रणालीमध्ये तरलतेचा अभाव यामुळे कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होईल.