अजितदादा तुम्हीच म्हणाला होता, 'राजकारण खूप वाईट आहे!'

टीम ई-सकाळ
Saturday, 23 November 2019

'राजकारण हे खूपच वाईट आहे. मी यातून बाहेर पडत आहे. तू ही राजकारण करू नको. आपण शेती करू,' असा सल्ला अजित पवार यांनी मुलगा पार्थला दिला होता.

कालपर्यंत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकांमध्ये हजेरी लावणाऱ्या अजित पवार यांनी थेट देंवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व राजकीय भूकंप या निमित्तानं पहायला मिळाला. राज्यातील तीन पक्ष विचारसरणी बाजूला ठेवून एकत्र येत असताना अजित पवार यांनी  स्वप्नातही नाही असा निर्णय घेऊन महाराष्ट्रालाच नव्हे तर, देशाला धक्का दिला. राजकारण खूप वाईट आहे, आपण शेती करू, असा आपल्या मुलाला सल्ला देणाऱ्या अजित पवार यांनी धक्कादायक राजकारण खेळून केवळ देशाला, महाराष्ट्राला किंवा पक्षालाच नव्हे तर, पवार कुटंबालाही धक्का दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा

27 स्पटेंबर रोजी काय घडलं?
राज्याच्या शिखर बँकेतील कथित गैरव्यवहारात अजित पवार यांचं नाव आलं. त्याच प्रकरणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडं ही बोट दाखवण्यात आलं. एकाही बँकेचा संचालक किंवा सभासद नसतानाही, शरद पवार यांना यात गोवण्यात आलं होतं. सक्तवसुली संचालनालयानं शरद पवार यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. नंतर संचालनालया बॅकफूटवर गेलं. तरीही पवार यांनी स्वतः सक्तवसुली संचालनालयात (ईडी) जाण्याची तयारी केली होती. त्यानंतर पवार यांना पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण देत पवार यांना ईडी कार्यालयात न जाण्याचं आवाहन केलं. 27 स्पटेंबर रोजी हा ड्रामा सुरू असताना, अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन, महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं नाट्य निर्माण केलं होतं. 

आणखी वाचा - शपथविधीपूर्वी फडणवीसांनी केली ही पूजा

आणखी वाचा - पवार कुटुंबात उभी फूट; सुप्रिया सुळेंचे डोळा पाणावले

काय म्हणाले होते अजित पवार?
राज्य शिखर बँक प्रकरणात शरद पवार साहेबांचा कोणताही संबंध नसताना, त्यांना ईडीने चौकशीला बोलवल्याने अस्वस्थ झाल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी त्यावेळी पत्रकार परिषद केले होते. तत्पूर्वी, ते जवळपास 12 तासांहून अधिक काळ नॉटरिचेबल होते. त्यांनी मुलगा पार्थ याच्याशी फोन वरून चर्चा केली होती. त्यावेळी 'राजकारण हे खूपच वाईट आहे. मी यातून बाहेर पडत आहे. तू ही राजकारण करू नको. आपण शेती करू,' असा सल्ला अजित पवार यांनी मुलगा पार्थला दिला होता. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांची मुंबईत सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली होती. शरद पवार यांनी अजित पवार यांची समजूत काढल्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय झाले आणि त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली. जणू काही घडलच नाही, असंच चित्र निर्माण करत त्यांनी विक्रमी मतांनी विजयही संपादन केला. पण, शिखर बँक प्रकरणात आपल्याला अडकवल्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप ज्या अजित पवारांनी भाजपवर केला. त्याच भाजपसोबत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. अजित पवार यांच्या या अजब निर्णयानंतर आता सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar advice to party politics is very bad asked to quit