मोठी बातमी : अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुमित बागुल
Wednesday, 4 November 2020

आज सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक झाली तेंव्हा धक्काबुक्की झाल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला.

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ, पत्रकार अर्णब गोस्वामी यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अलिबाग कोर्टाकडून अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयांनी कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. आज सकाळी अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक केली गेली आहे. यानंतर त्यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आलं. अन्वय नाईक यांनी मे २०१८ मध्ये त्यांच्या राहत्या घरी अलिबागमध्ये आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्याने अन्वय नाईक यांना आत्महत्या करावी लागली असा आरोप नाईक कुटुंबियांकडून केला गेलाय. अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये देखील अर्णब गोस्वामी यांचं नाव आहे. 

महत्त्वाची बातमी : कलम 353 अंतर्गत मुंबईतही अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल

आज सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक झाली तेंव्हा धक्काबुक्की झाल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला. त्यामध्ये त्यांना हाताला आणि पाठीला दुखापत झाल्याचे देखील म्हंटले. त्याबाबत पोलिसांकडून काही व्हिडीओ स्वरूपातील पुरावे देखील सादर करण्यात आले. दरम्यान कोर्टाने अर्णब यांचा दावा फेटाळून लावल्याची माहिती आहे. 

अर्णब गोवामी यांच्या पत्नी यांनी देखील कोर्टामध्ये मोबाईलचं रेकॉर्डिंग सुरु ठेवलं होतं अशी माहिती टीव्ही रिपोर्टमधून समोर येते. काही माध्यमांना अक्षरा नाईक यांचे वकील विलास नाईक यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. त्यांच्या माहितीनुसार कोर्टात सुनावणी सुरु असताना अर्णब यांच्या पत्नी यांनी कोर्टात आपला मोबाईल सुरु ठेवून रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता. यावर न्यायाधीशांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि असा प्रकार पुन्हा होऊ नये अशी देखील त्यांना तंबी दिलेली आहे. 

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांची दुसऱ्यांदा मेडिकल टेस्ट केल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता कोर्टात पुन्हा सुनावणीला सुरवात केली गेली. आता अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

महत्त्वाची बातमी "भाजप समर्थकांना देशात सात खून माफ आहेत असं मानायचं का ?" मलिकांचा सवाल

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ : 

दरम्यान अर्णब गोवामी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबईत कलम ३५३ अंतर्गत आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि पोलिसांसोबत गैरवर्तन करणे, या आरोपात अर्णब गोवामी यांच्याविरोधात मुंबईतील लोअर परळमधील ना म जोशी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

alibaug court sent arnab gowami to 14 days judicial custody anvay naik case

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alibaug court sent arnab gowami to 14 days judicial custody anvay naik case