ठाणेकर तयारी करा! उद्यापासून 'या' वेळेत सुरु होतील दुकानं, असे असतील नियम

पूजा विचारे
Friday, 14 August 2020

उद्यापासून म्हणजेच १५ ऑगस्टपासून सर्व दुकानं सुरु करण्याची ठाणे महापालिकेनं परवानगी दिली आहे. ही सर्व दुकानं आठवड्यातून सातही दिवस खुली असतील.

मुंबईः मुंबईत ५ ऑगस्टपासून सर्व दुकानं सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत सुरु झाली. त्यानंतर आता ठाण्यातही सर्व दुकानं सुरु होणार आहेत. उद्यापासून म्हणजेच १५ ऑगस्टपासून सर्व दुकानं सुरु करण्याची ठाणे महापालिकेनं परवानगी दिली आहे. ही सर्व दुकानं आठवड्यातून सातही दिवस खुली असतील. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. 

एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. ठाणे शहरातील जी आस्थापने P1 आणि P2 नुसार सुरु होते, ती उद्यापासून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दरम्यान मॉल्स, मार्केट, जिम आणि स्वीमिंग पूलबाबत आढावा घेण्यात येणार आहे.  त्यानंतर निर्णय घेण्यात येईल अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यात. तसंच सिनेमागृहे अजून काही काळ बंद असणार आहेत.

तसंच कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नसून ठाणे महापालिका चांगलं काम करतेय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांचं सहकार्याची गरज असल्याचं एकनाथ शिंदे व्यापारी संघटनांच्या बैठकीत म्हणालेत.

हेही वाचाः राष्ट्रवादीच्या 'मिशन घरवापसी'बद्दल समजताच भाजपनं दिली 'ही' प्रतिक्रिया

जून महिन्यात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर कोरोनाचा प्रार्दुभाव ठाणे महापालिका क्षेत्रात वाढला होता. हा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मांनी २ ते १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता.  त्यानंतर सम-विषम पद्धतीने दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्याआधी चार महिने लॉकडाऊनमुळे दुकानं बंद ठेवण्यात आली होती. 

सम-विषय नियमामुळे महिन्यातून पंधरा दिवस व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गासमोर आर्थिक संकट उभं राहिलं होतं. त्यात आता सण उत्सवांचे दिवस असल्यानं नागरिकांची दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होण्याची भीती वर्तवण्यात येते. त्यामुळं लोकांची गर्दी टाळण्यासाठी आठवड्यातल्या सातही दिवस सर्व दुकानं सुरु ठेवण्याची मागणी व्यापारी संघटनांकडून करण्यात आली होती. 

यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह आयुक्त आणि शहरातील सर्वच आमदारांची भेट घेतली होती.  मुंबईत अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला असताना ठाण्यात मात्र हा निर्णय प्रलंबित होता. त्यामुळे व्यापारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली होती.  त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी १३ ऑगस्टला या मागणीला मान्यता दिली. शिंदे यांनी ही मागणी मान्य करुन घेतल्यानं व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचाः राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं मिशन, 'या' बड्या नेत्यांकडे सोपवली जबाबदारी

शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत  झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला असून या बैठकीला महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांना सूचना

गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासोबत मास्क घालणं, सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करणं,  दुकानामध्ये काम करणाऱ्या सर्वाची चाचणी करावी. तसंच राज्य सरकारसह महापालिका प्रशासनानं ज्या अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत ,त्यांचे पालन होईल याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्रत्येक व्यापाऱ्यांची असेल अशा सूचनाही देण्यात आल्यात.

all shops open from 15th august thane 9 am to 7 pm


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all shops open from 15th august thane 9 am to 7 pm