अंबरनाथ मनसे शहर उपाध्यक्षाची धारधार शस्त्रांनी हत्या, चारही आरोपी अटकेत

श्रीकांत खाडे
Wednesday, 28 October 2020

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची भररस्त्यात धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना आज सायंकाळी घडली. जखमी अवस्थेत पाटील यांना कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसून, शिवाजी नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अंबरनाथ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची भररस्त्यात धारधार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना आज सायंकाळी घडली. जखमी अवस्थेत पाटील यांना कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांची हत्या करून पळून जाणाऱ्या चारही आरोपींना मुरबाड पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अटक केली आहे. हत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसून, शिवाजी नगर पोलिस अधिक तपास करीत आहे. 

क्लिक करा : जान सानूच्या अडचणीत वाढ, पोलिस कारवाईचे गृहमंत्र्यांनी दिले संकेत

बुधवारी सायंकाळी 6 च्या सुमारास राकेश पाटील हे अंबरनाथ-पाले गावातील संकुलाजवळ कामानिमित्त गेले होते. यावेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला चढविला. पाटील यांनी त्यांचा प्रतिकार देखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौघांच्या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले.

क्लिक करा : मुंबईतील फाऊंटन बुक स्ट्रीट सुनासुनाच... 20 टक्‍क्‍यांहून कमी पुस्तकांची विक्री, विक्रेते आर्थिक संकटात

त्यांना त्वरित कल्याणच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, अवघ्या दोन तासात चारही आरोपी अटकेत असून इतर आरोपींचा देखील पोलिस शोध घेत आहेत.

चारही आरोपी राकेश पाटील यांची हत्या करून मुरबाडच्या दिशेने पळून जात होते. त्याच दरम्यान वायरलेसवरून मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड पोलिसांनी मुख्य मार्गावर नाकाबंदी लावली होती. या हत्येचा मनसेने तीव्र शब्दात निषेध केला आहे. ही हत्या राजकीय वैमनस्यातून घडली आहे की इतर काही कारणातून, याचा पोलिस शोध घेत आहेत.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambernath MNS city vice president killed with sharp weapons