कुणी प्लाझ्मा देतं का प्लाझ्मा ! कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा मिळवणे कठीण

कुणी प्लाझ्मा देतं का प्लाझ्मा ! कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा मिळवणे कठीण

मुंबई, 13 : प्लाझ्माचा वापर हा कोरोना संसर्गाच्या उपचारपद्धतीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरण्याचे निर्देश 'आयसीएमआर'ने दिले असले, तरीही मुंबईमध्ये त्याला मिळणारा प्रतिसाद कमी आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या 200 मिलीच्या बॅगसाठी साडेपाच हजार रुपये दर राज्य सरकारने आकारले असूनही काही दाते प्लाझ्मासाठी पैसे हवे म्हणून अडून राहतात, तर अनेक जण अडचणीत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्लाझ्मा जास्तीच्या दरात विकत असून प्लाझ्मा विक्री बाबतचा सर्रास काळाबाजार सुरू असल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. 

त्याचबरोबर, कोरोनाचे गंभीर रुग्ण बरे करण्यासाठी उपचारात वापरण्यात येणाऱ्या प्लाझ्माच्या दराबाबत एक वाक्यता नाही. रक्तपेढ्यांना प्लाझ्मा संकलित करणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्याची साठवणूक करून ठेवणे यासाठी काही खर्च येतो. मात्र, राज्यात एकच दर आकारले जात नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक होते. शिवाय, कडक नियमावलीमुळे कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा मिळवणेही कठीण होते. सध्याच्या परिस्थितीत राज्यात प्लाझ्माची ही कमतरता भासू लागली आहे. विशेष म्हणजे मुंबईपेक्षा महानगर आणि बाहेरील जिल्ह्यांतून अधिक मागणी असल्याचं दिसून आलं आहे. 

प्लाझ्मासाठी नगर, नाशिक गाठले - 

काही रक्तगटातील प्लाझ्मा दुर्मिळ असल्याने ते उपलब्धही होत नाहीत. असाच एक अनुभव पुण्याच्या एका रुग्णाच्या नातेवाईकाला आला असून त्यांच्या आईला बी निगेटिव्ह या रक्तगटाच्या प्लाझ्माची गरज होती. पण, त्यांना पुण्यात हा प्लाझ्मा उपलब्ध झाला नसल्याकारणाने त्यांची प्लाझ्मासाठी धावपळ झाली. त्यांनी आईसाठी अहमदनगर आणि नाशिक हून प्लाझ्मा जमा केला. त्यांनी पुण्यात प्लाझ्मा मिळावा यासाठी बरेच प्रयत्न केले मात्र, तिथे तो उपलब्धही नसताना 15 हजार रुपये एका बॅगची किंमत सांगितली. प्लाझ्माची किंमत सरकारने निश्चित केली असली तरी काळाबाजार ही सुरू असून रक्तपेढ्यांवर सरकारचे नियंत्रण असले पाहिजे, असे नातेवाईकांनी सांगितले. 

वैद्यकीय विज्ञानाच्या भाषेत प्लाझ्मा थेरपीला प्लाझ्माफेरेसिस म्हणून ओळखले जाते. प्लाझ्मा थेरपी म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामध्ये रक्तातील द्रव किंवा प्लाझ्मा रक्त पेशींपासून विभक्त होतात. कोविड -19 मधून बरे झालेले लोक प्लाझ्मा दान करू शकतात. ज्याचा उपयोग सौम्य आणि मध्यम कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जातो. 

ही आहे नियमावली -  

जी व्यक्ती 18 ते 60 वयोगटातील असेल, हिमोग्लोबिन (HB) 12.5 टक्के असेल, वजन साधारणपणे 50 किलोपेक्षा जास्त असेल, कोमॉर्बीडीटी नसेल म्हणजेच रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मुत्रपिंड, हृदयविकार नसतील अशा लोकांचा प्लाझ्मा आपल्याला घेता येतो. जे लोक कोरोनाबाधित बरे होऊन 28 दिवस झाले आहेत त्यांना प्लाझ्मा दान करता येतो. प्लाझ्मा देत असताना प्लाझ्माफेरीसीस यंत्रातून काढला जातो. यामध्ये जो दाता आहे त्याचा प्लाझ्मा कम्पलसरी ट्रायटेट केला जातो आणि त्या ठिकाणी 1: 64 अशा पद्धतीने ते असेल तर तो प्लाझ्मा पात्र असतो. कोविड केअर सेंटरमधून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांनी 10 दिवसांनंतर आणि 28 दिवसांच्या आत प्लाझ्मा दान केला पाहिजे. रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील अँटीबॉडी रुग्णाला दिली जातात. या अँटीबॉडी आधी कोरोनाशी लढलेल्या असतात. प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर ठरवतात. मध्यम आणि तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या आणि नेहमीच्या औषधोपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण यासाठी निवडला जातो.  

या कारणामुळे प्लाझ्माची वाढली मागणी - 

अनेक ठिकाणी गंभीर रुग्णांना किंवा कोणत्याही औषधोपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या किंवा कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील रुग्णांवर खासगी रुग्णालयांत रक्तद्रव उपचार (प्लाझ्मा थेरपी) पद्धतीचा जास्त वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेही मागणी वाढल्याचे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

प्रकृती गंभीर होण्याआधीच म्हणजे पाचव्या किंवा सातव्या दिवशी प्लाझ्मा देणे आवश्यक आहे. योग्य रुग्णाला योग्य वेळी हे उपचार दिल्यास फायदा होऊ शकतो असे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ आणि राज्याच्या करोना विशेष कृती दलाचे डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले. 

कोरोनाची भीती कायम आणि समस्या कायम - 

प्लाझ्मा दान हे इच्छुक दान असल्याकारणाने त्याला प्रतिसाद नक्कीच कमी मिळत आहे. शिवाय, लोकांच्या मनात कोरोनाची धास्ती असल्याकारणाने कोरोनानंतर उद्भवणाऱ्या समस्यांमुळे इच्छूक दान करण्यास येत नसावेत,  मात्र समुपदेशन सुरु आहे.  प्लाझ्मा घेण्याची प्रक्रिया किमान 2 तासांची असते. शिवाय, प्लाझ्मा दाता तब्येतीने सुदृढ असले पाहिजे. त्यांच्यात ठराविक अँटीबॉडीज ही तयार होण्याची गरज असते. अनेक नियमांच्या अधीन राहूनच प्लाझ्मा गोळा आणि दान केला जातो. 
- डॉ. रमेश भारमल, संचालक, प्रमुख  पालिका रुग्णालये.

( संपादन - सुमित बागुल ) 

amid corona due to strict norms getting plasma has become headache

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com