आणि तिला आली दुसऱ्या वर्षातच मासिक पाळी...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

वाचा या चिमुकलीची व्यथा

विरार : दोन वर्षांच्या मुलीला मासिक पाळी येऊ लागल्याने तिचे जन्मदाते घाबरून गेले. या चिमुकलीला प्रिकॉशियस प्युबर्टी (अकाली पौगंडावस्था) हा दुर्मीळ त्रास असल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले. तिच्यावरील खर्चिक उपचारांसाठी ‘चाईल्ड हेल्प फाऊंडेशन’ने मदतीचा हात पुढे केल्यामुळे या गरीब कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा - महिलांनो 'त्या' दिवसांत काळजी घेतायना?

संगीताचे (नाव बदलले आहे) ४० वर्षांचे वडील रामदास (नाव बदलले आहे) रिक्षाचालक आहेत. त्यामुळे उपचार आणि घरखर्च जुळवणे त्यांना कठीण जाते. संगीता सर्वसामान्य मुलांसारखीच होती. परंतु दोन वर्षांची झाल्यावर तिला मासिक पाळी सुरू झाल्याची चिन्हे दिसू लागली.

हेही वाचा - हनिमूनला जाताय 'या' गोष्टी नक्की सोबत घेऊन जा...

अनेक तपासण्यांनंतर संगीताला प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणजे अगदी कमी वयात मासिक पाळी सुरू होण्याची समस्या असल्याचे निदान झाले. तिच्या उपचारांसाठी रामदास जीवाचे रान करत होते. परंतु, इतक्‍या कष्टानंतरही या कुटुंबाची चिंता दूर होत नव्हती. संगीताच्या परिस्थितीबाबत समजल्यावर चाईल्ड हेल्प फाऊंडेशनने मदतीसाठी पुढाकार घेतला. संस्थेच्या प्रतिनिधींनी रामदास यांची भेट घेतली. संगीताचे केसपेपर बघितले आणि वैद्यकीय उपचारांची जबाबदारी घेतली.

अवघे अर्धा टक्का प्रमाण

सर्वसाधारणत: भारतीय मुलींना ९ ते १२ व्या वर्षादरम्यान पहिली पाळी येते. परंतु संगीताला वयाच्या दुसऱ्या वर्षीच रक्तस्राव होऊ लागला. जागतिक पातळीवर २० हजारांमधून एका मुलीला अकाल पौगंडावस्थेची (प्रिकॉशियस प्युबर्टी) समस्या भेडसावते. म्हणजे या समस्येचे प्रमाण जागतिक स्तरावर अवघे ०.५ टक्‍के आहे. त्यामुळे संगीतावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांसाठी हा अभ्यासाचा विषय बनला. या परिस्थितीत स्तन, हाडे आणि इंद्रियांचा विकास प्रौढ व्यक्तीसारखाच होतो. 

पैशाअभावी मुलीला नियमित इंजेक्‍शन देणे शक्‍य होत नव्हते. मात्र उपचारांची जबाबदारी चाईल्ड हेल्प फाऊंडेशनने घेतल्याने आम्हाला खूप मदत झाली. 
- रामदास  (बदललेले नाव), मुलीचे वडील  

या दुर्मीळ आजारावर मात करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना संगीता चांगला प्रतिसाद देत आहे. 
- डॉ. साजिली मेहता, वाडिया रुग्णालय

 

web title : And in her second year, she had a menstrual cycle


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And in her second year, she had a menstrual cycle