आणि त्या दोघांनी केला स्वतःलाच पेटवण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

ठाण्यातील घटना

ठाणे - अनधिकृत बांधकामावरील कारवाई रोखण्यासाठी मनोरमानगर येथील आई व मुलाने ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता.26) सायंकाळी घडली. महापालिकेच्या सुरक्षा रक्षक व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतल्याने दोघांनाही थांबवण्यात यश आले. याप्रकरणी, सरकारी कामात अडथळा आणण्यासह आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दोघांवर दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा - फक्त हे कानातले घाला कोणी काढू शकणार नाही तुमची छेड

रिटा गुप्ता (45) असे महिलेचे; तर निखिल गुप्ता (24) असे तिच्या मुलाचे नाव आहे. या दोघांविरोधात कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अटक केल्यानंतर पोलिस ठाण्यातही महिलेने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून तिच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील मनोरमानगर परिसरात एका आदिवासी महिलेच्या जागेवर रिटा गुप्ता यांनी अनधिकृत बांधकाम केले होते. याबाबत आदिवासी महिलेने महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सदरच्या बांधकामाची पाहणी करून बांधकाम थांबवले होते.

हेही वाचा - धक्कादायक! म्हणून त्याने तिला व्हिडिओ काॅलवर दिला तलाक

जोपर्यंत संपूर्ण प्रकरण स्पष्ट होत नाही, तोपर्यंत बांधकाम करता येणार नाही, असे पालिकेच्या वतीने कळवण्यात आले होते. तरीही, बांधकाम तोडू नये यासाठी धमकावत बुधवारी (ता.26) सायंकाळी रिटा यांनी आपल्या मुलांसह प्रभाग समितीमध्ये जाऊन गोंधळ घातला. अधिकाऱ्यांना भेटू देत नसल्याने तिने व मुलाने स्वत:वर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले. त्यानंतर दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

प्रभाग समितीमध्ये जाऊन सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल व आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे महिलेसह तिच्या मुलाविरोधात आम्ही पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 
- अनुराधा बाबर, सहायक आयुक्त, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती  

 

web title : And they both tried to burn themselves


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And they both tried to burn themselves