esakal | अंधेरीतील हॉटेलमध्ये चोरी करणार्‍या नोकराला अटक Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

 Mumbai

अंधेरीतील हॉटेलमध्ये चोरी करणार्‍या नोकराला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अंधेरीतील एका नामांकित हॉटेलमध्ये चोरी करणार्‍या नोकराला सहा महिन्यानंतर आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने नाशिक येथून अटक केली. ऋषिकेश कल्याणसिंग शिसोदे असे २६ वर्षीय आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. ऋषिकेश हा मूळचा जळगावच्या चाळीसगाव, कुंजरचा रहिवाशी आहे.

फेब्रुवारी महिन्यांत तो अंधेरीतील एका हॉटेलमध्ये हाऊसकिपर म्हणून कामाला लागला होता. एक महिना काम केल्यानंतर तो अचानक हॉटेलमधून निघून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने मॅनेजरसह मालकांना सांगितला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने मॅनेजर नरेशकुमार खंडका यांनी हॉटेलमध्ये जाऊन त्याची चौकशी सुरु केली होती. याच दरम्यान त्यांना कॅश काऊंटरमधील ४० हजार रुपयांची कॅश, लॅपटॉप आणि विदेशी दारु असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर ऋषिकेशनेच ही चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आंबोली पोलीस ठाण्यात ऋषिकेशविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता.

हेही वाचा: मुंबईत आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून होणार सुरु - BMC

ही शोधमोहीम सुरु असतानाच ऋषिकेश हा नाशिक येथील रेड चिल्ली हॉटेलमध्ये काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमेश्‍वर कामठे यांच्या पथकातील एपीआय अतुल सानप, पोलीस हवालदार पवार, ढेमरे यांनी त्याला सहा महिन्यानंतर नाशिक येथून अटक केली. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

loading image
go to top