मुंबई : जोपर्यंत सरकार मानधनात भरीव वाढ करणार नाही, तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि अंगणवाडी कर्मचारी असोसिएशनच्या अंगणवाडी सेविका सरकारने दिलेल्या मानधन वाढीवर नाराज असून आजही आंदोलनासाठी आझाद मैदानात बसल्या आहेत.
किमान 15 हजार मानधन मिळाले पाहिजे, हजार -दोन हजार रुपयांच्या वाढीने काहीही होत नाही असे सांगत या अंगणवाडी सेविकांनी इथेच बसण्याचा निर्धार केला आहे. कोविड काळातील ठाकरे सरकारनेही फक्त आश्वासन दिले होते, या सरकारने मानधन जाहिर केली ती मान्य नसल्याचे स्पष्ट करत आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत धरणे आंदोलन मागे घेणार नाही असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर यांनी सांगितले.
कोविड काळातील एक रुपयाही दिला नाही -
कोविड काळात फक्त गौरव झाला, ठाकरे सरकारने ही आश्वासन दिली पण अंमलबजावणी झालेली नाही, आताचे सरकार घोषणा करून मोकळे झाले आहे पण कृती नाही, तुटपंजी वाढ दिली पण ती मान्य नाही. जे आमचे प्रश्न सोडवतील ते आमचे. माझे कुटुंब माझी जबाबदारी आम्ही पेलली , पण आमची सरकारबाबत कायम खेद आहे , प्रोत्साहन भत्ता ही दिलेला नाही.
माया परमेश्वर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
अंगणवाडी सेविकांना पगार दिला पाहिजे -
अंगणवाडी सेविका खर्या अर्थाने अनेक मुलांच्या माता आहेत, अंगणवाडी सेविकांना मानधन नाही, तर पगार मिळायला हवा. अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्र शासनात नोकरी मिळायला हवी. अंगणवाडी सेविका बरीचशी कामे करतात. बीए- एम एड झालेल्या सेविका आहेत, त्यांचे प्रश्न मी सभागृहात मांडणार आहे आणि प्रश्न मार्गी लागतील यासाठी प्रयत्न करणार आहे.
मनिषा कायंदे, शिवसेना, आमदार
तरच घरी जाणार -
दोन दिवसांपासून आंदोलनासाठी आम्ही बसलो आहोत,पण कोणीच दखल घेतली नाही. अंगणवाडी सेविकांना 15 हजार वेतन आणि मदतनीसांना 10 हजार वेतन मिळाल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही.
राधा राजपूत, औरंगाबाद अंगणवाडी सेविका
आता दिलेली मानधन वाढ मान्य नाही-
पोरं- बाळं सोडून आम्ही इथे आलोय,आजच्या बजेटमध्ये ही तीच सारखीच वाढ सरकारने जाहिर केली. ही वाढ आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही इथे बसलोय, भरीव मानधनाशिवाय इथून हटणार नाही.
प्रतिभा सौदांणे, हरसवाडी, अंगणवाडी सेविका
कामानुसार मानधन फार कमी -
आमच्या संघटनेच्या अंगणवाडी सेविकांना ही मानधन वाढ मान्य नाही. दिवसभरात 16 ते 17 कामे करावी लागतात. संपूर्ण दिवस कामात जातो. घर दार सोडून मुंबईत आलोय. त्यामुळे, शासनाने आमच्या मानधनात भरीव वाढ करावी आणि वेतनश्रेणी लागू करावी, मोबाईलचे पोषण ट्रॅकर अॅप मराठीतून द्यावे.
रेखा गवारे, चाळीसगाव, अंगणवाडी सेविका
ग्रॅज्युटी लागू करावी
किशोरवयीन मुलींपासून ते गर्भवती महिला, बाळ सहा वर्षाचे होईपर्यंत आम्हाला सर्व बघावे लागते. मुलांचे लसीकरण, आहार, कुपोषणाचा अहवाल जमा करणे, एका अंगणवाडीत 200 मुले आहेत, त्यांचा संपूर्ण अहवाल आम्हाला ठेवावा लागतो. महागाईच्या काळात एवढूशा पगारात काहीही होत नाही. आता ग्रॅज्युटी लागू करावी.
सरला देशमुख, तळेगाव, अंगणवाडी सेविका
निवृत्तीनंतरही पेंशन नाही -
निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना एक लाख रूपये एक रकमी लाभ दिला जातो, तो गेली तीन वर्षे मिळालेला नाही. पेंशनची घोषणा केली होती पण, अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख नाही, 100 आमदारांचा सेविकांना पाठींबा दिला यात त्यांनी सेविकांना 15 हजार व मदतनीसला 10 हजार देणार म्हणून सांगितले त्याची ही दखल घेतली नाही.
सुधीर सोनावणे, अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी असोसिएशन
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.