....‘या’ 18 गावांची स्वतंत्र नगर परिषद; मुख्यमंत्र्यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतून 18 गावे स्वतंत्र काढून त्यांची नगर परिषद स्थापन करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विधिमंडळात केली.

कल्याण : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतून 18 गावे स्वतंत्र काढून त्यांची नगर परिषद स्थापन करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विधिमंडळात केली. सर्वपक्षीय गाव बचाव संघर्ष समितीने या घोषणेवर सावध भूमिका घेतली असून रविवारी (ता. 15) समितीची बैठक बोलावण्यात आली आहे; त्यानंतरच याबाबत समिती अधिकृत भूमिका जाहीर करेल, असे समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले.

ही बातमी वाचली का? तापमानाचा पारा घसरल्याने ‘कोरोना’ची भीती वाढली
 
1983 मध्ये स्थापन झालेल्या कल्याण महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कल्याण-शीळ परिसरातील 27 गावातील ग्रामस्थांनी गावे पालिकेतून बाहेर काढली जावीत, यासाठी आंदोलन सुरू केले होते. राज्यातील तत्कालिन युती शासनाने 14 गावे पालिका क्षेत्रातून वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात उर्वरित गावे पालिकेतून वगळण्यात आली. जून 2015 मध्ये भाजपप्रणीत युती सरकारने ही गावे पुन्हा कल्याण-डोंबिवली पालिकेत समाविष्ट केली. या गावांसाठी संघर्ष समितीने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले. त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात ही गावे वगळण्याची अधिसूचना काढण्यात आली; परंतु कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे कारण देऊन निवडणूक आयोगाने पालिकेच्या सीमारेषा बदलण्यास हरकत घेतली. त्यानंतरच्या पाच वर्षांत संघर्ष समितीने विविध मार्गाने आंदोलन करत गावे वगळण्याची भूमिका कायम ठेवली होती.

ही बातमी वाचली का? उद्योजकांनी पुकारला बेमुदत बंद! वाचा नेमकं काय झालं...

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पाठपुरावा करून संघर्ष समितीने ही गावे वगळण्यासाठीचे आंदोलन अधिक तीव्र केले होते. परिणामी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर 27 गावांची स्वतंत्र नगर परिषद करण्याबाबत मागविण्यात आलेल्या हरकती, सूचनांवर सुनावणी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 27 पैकी 18 गावांची स्वतंत्र नगर परिषद करण्याची घोषणा केली. कल्याण-शीळ रस्त्याच्या पश्‍चिमेस असलेल्या नऊ गावांचे शहरीकरण झालेले असल्यामुळे ही गावे कल्याण-डोंबिवली पालिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. 

ही बातमी वाचली का? रविवारी हार्बर, पश्‍चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक!
 
पालिकेत कायम असलेली गावे पुढीलप्रमाणे 
आजदे, सागाव, नांदिवली, पंचानंद, धारवली, संदप, उसरघर, काटई, भोपर आणि देसले पाडा 

पालिकेतून वगळण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे 
घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळिवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे.

ही बातमी वाचली का? मनसेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द, कारण आहे...
 
27 गावे पूर्णपणे वगळण्याची मागणी होती. शहरीकरण झालेली गावांमध्ये काटई, संदपचा समावेश करण्यात आला आहे, प्रत्यक्षात या गावांचे शहरीकरण झालेले नाही. स्वतंत्र नगर परिषदेमध्ये औद्योगिक क्षेत्र नसल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सरकारला नगर परिषदेला निधी उपलब्ध करून द्यावा लागेल. पूर्वीच्या सरकारने या गावातील दहा गावांचे ग्रोथ सेंटर बनवण्याची घोषणा केली होती. त्यातीलही काही गावे पालिका क्षेत्रात असणार आहेत. हा अहवाल जागेची प्रत्यक्ष पाहणी न करता तयार केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल. 
- प्रमोद पाटील, आमदार, कल्याण ग्रामीण .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announcement of an independent city council, chief minister of 18 villages in Thane