esakal | चीनविरोधात संताप; मुंबईत चिनी वस्तू नष्ट करण्याचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

चिनी वस्तूंची तोडफोड; मुंबईत आंदोलन

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे नेते, अभिनेते, खेळाडूंना आवाहन

चीनविरोधात संताप; मुंबईत चिनी वस्तू नष्ट करण्याचे आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेला समर्थन करावे, असे आवाहन कॉन्फेड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापारी-व्यावसायिकांच्या देशव्यापी संघटनेने सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व राजकीय पक्षनेते, अभिनेते, खेळाडू आदींना केले आहे. तर भाजयुमोच्या मुंबई शाखेने सनदशीर मार्गाने चिनी मालाचा नाश करण्याचे आंदोलन सुरु केले आहे.  

तुम्ही स्वतः चिनी मालावर बहिष्कार घालाच, पण चिनी उत्पादनांच्या जाहिरातीही करू नका, तसेच चिनी मालावरील बहिष्कार मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही जनतेला करा, असे कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले आहे. अनेक लहानमोठे अभिनेते चिनी उत्पादनांच्या जाहिराती करतात. त्याचा प्रभाव देशातील लहान मुलांवर तसेच तरुणांवर, महिलांवर पडतो व चिनी उत्पादने घेण्यास ते प्रवृत्त होतात. देशाच्या राज्यघटनेनुसार प्रत्येकाला व्यवसाय स्वातंत्र्य आहे. मात्र चीनच्या आक्रमकपणाला सर्व बाजूंनी शह द्यायचा असेल तर अभिनेते, खेळाडू आदींनी चिनी उत्पादनांच्या जाहिराती नाकारून देशासाठी एवढा त्याग करणे आवश्यक आहे.

सावधान! 'Zoom App' वापरताय? मग सावध राहा; महाराष्ट्र सायबर विभागाचं नागरिकांना आवाहन.. 

भारतातील लोकप्रीय अभिनेते, खेळाडू यांच्यामार्फत आपल्या उत्पादनांच्या जाहिराती करून येथील बाजारपेठ बळकावण्याचे चीनचे व्यापारतंत्र आहे. त्यामुळे ते अभिनेत्यांना आपल्या जाहिरातींमध्ये घेतात, मात्र हे अभिनेते, खेळाडू चिनी मालावरील बहिष्कार मोहिमेत सहभागी झाले तर या आंदोलनाला मोठेच बळ मिळेल, असाही कॅट चा दावा आहे. इंडियन ऑलिंपिक असोसिएशन, बीसीसीआय आदींनी चिनी पुरस्कर्त्यांना थारा देऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 

भाजयुमोचे आंदोलन
दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चाच्या मुंबई शाखेतर्फे सनदशीर मार्गाने चिनी माल नष्ट करण्याचे आगळेवेगळे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या संकल्पनेतून हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. तिवाना आपल्या कार्यकर्त्यांसह प्रमुख बाजारपेठांमध्ये जाऊन चिनी मालाची विक्री न करण्याचे आवाहन दुकानदारांना करतात. ग्राहकांनाही चिनी माल खरेदी न करण्याची गळ घातली जाते. भारत चीन सीमेवर झालेल्या संघर्षाची माहिती देणारी पत्रकेही यावेळी वाटली जातात. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान झालेल्या परकीय मालाची होळी करण्याच्या आंदोलनाचीही माहिती यावेळी दिली जाते. आताच्या आधुनिक स्वदेशी आंदोलनासाठी चिनी माल नष्ट करण्याचे आवाहनही दुकानदारांना केले जाते. या आवाहनास प्रतिसाद देऊन जे दुकानदार आपल्याकडील जो चिनी माल नष्ट करण्यास तयार होतात, त्यांचा माल दुकानासमोर सर्वांसमक्ष नष्ट केला जातो व भारतमातेच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या जातात. सामाजिक जाणीव ठेऊन तेथील कचराही लगेच स्वच्छ केला जातो व कार्यकर्ते आपल्या मोहिमेवर निघतात. केवळ बहिष्काराचे आवाहन करण्यापेक्षा अशा परिणामकारक मोहिमांमुळेच लोकांमधील बहिष्काराच्या जाणिवा तीव्र होतील, यापुढे ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल, असेही तिवाना यांनी 'सकाळ'ला सांगितले.

कसा साजरा होणार गणेशोत्सव; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

loading image