मान्सूनच्या आगमनाने मुंबईकर सुखावले! शहरात जोरदार वाऱ्यासह पावसाची एन्ट्री

मान्सूनच्या आगमनाने मुंबईकर सुखावले! शहरात जोरदार वाऱ्यासह पावसाची एन्ट्री

मुंबई- गुरुवारी सकाळपासून मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यासह मुंबईत पावसानं अखेर एन्ट्री घेतली. मुंबईतल्या दादर, माटुंगा, लालबाग, परळ, अंधेरी, मालाड, कुर्ला या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर पावसानं काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर आज पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. पहाटेपासून मुंबईत ढगाळ वातावरण होतं. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुंबईतल्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. मुंबईसह नवी मुंबई, पनवेल भागातही पाऊस सुरु आहे. 

मुंबईत दरवर्षी जुन महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होतो. मात्र यंदा हवामान विभागानं पहिल्या पंधरवड्यात मुंबईत मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसंच, मान्सून दाखल होण्यापूर्वी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे.

सोमवारी सकाळी पावसानं मुंबईत हजेरी लावली होती. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा  दिलासा मिळाला. या पावसामुळे शहरात गारठा पसरला होता. मंगळवारी भिवंडी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. 

असा असेल यंदाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज 

यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. एप्रिल महिन्यात आयएमडीने यंदाच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. 

निसर्ग चक्रीवादळाचा फटका 

निसर्ग चक्रीवादळामुळं अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. हे वादळ कोकण किनारपट्टीवर धडकलं. या चक्रीवादळाचा फटका अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, दिवेआगर या तालुक्यांना जोरदार बसला. या चक्रीवादळानं दिशा बदलल्यानं मुंबईवरील संकट टळलं मात्र तरी या वादळाचा फटका मुंबईलाही बसला. मुंबईतही जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्यावेळी या मान्सूनपूर्व पावसामुळं मुंबईच्या सखल भागांत पाणी साचलं होतं. जोरदार पाऊस आणि सोसाट्यांचा वाऱ्यामुळे मुंबईत 100 हून जास्त झाडं कोसळण्याचीही घटना घडल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com