Asiatic Society Mumbai

Asiatic Society Mumbai

sakal

Asiatic Society Mumbai: एशियाटिकचे सदस्यत्व केव्हा मिळणार; ओळखपत्र न मिळाल्यास मतदानास मुकण्याची चिंता

Mumbai News: मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या सभासदत्व प्रक्रियेत विलंब झाल्याने अर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दोन शतकांहून जुनी संस्था आता राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
Published on

मुंबई : एशियाटिक सोसायटीच्या सदस्यत्वासाठी यंदा सुमारे 1,600 हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. दोन शतकांहून अधिक जुन्या या संस्थेच्या इतिहासातील हा एक नवा विक्रम मानला जातो. विक्रमी संख्येने अर्ज आल्यामुळे व्यवस्थापनाची चांगलीच दमछाक झाली आहे. मात्र अनेक अर्जदारांना आपले अर्ज मंजूर झाले की नाही, तसेच सभासद फी भरायची की नाही, याबाबत संस्थेकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

यंदा एशियाटिक सोसायटी, मुंबईचे सभासद होण्यासाठी विक्रमी संख्येने अर्ज आले. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर होती. शेवटच्या तीन दिवसांतच जवळपास 600 ते 800 अर्ज दाखल झाले. सदस्यत्वासाठी अर्ज केलेले उमेदवार आता एशियाटिक सोसायटीकडून संदेश येण्याची प्रतीक्षा करत आहेत.

Asiatic Society Mumbai
Mumbai Local Train: लोकल ट्रेनमधील मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, प्रवाशांना मोठा दिलासा

अर्ज पडताळणी समितीने काही अर्जदारांना एशियाटिकमध्ये बोलावून मुलाखती घेतल्या आहेत. दहा–पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही सदस्यत्वाबाबत कोणतीही माहिती एशियाटिककडून देण्यात आलेली नाही. 30 ऑक्टोबरपर्यंत सदस्यत्व मान्य झाल्याची माहिती मिळाल्यास शुल्क भरणे आणि ओळखपत्र घेणे हे सोपस्कार अजून बाकी आहेत. त्यामुळे शेकडो अर्जदार एशियाटिककडे डोळे लावून बसले आहेत.

एशियाटिकचे ओळखपत्र नसल्यास मतदान करता येणार नाही, त्यामुळे अर्जदारांची चिंता अधिकच वाढली आहे. 27 ऑक्टोबरला सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यानंतर सदस्य पडताळणी समितीच्या दोन बैठका झाल्याचे कळते. मात्र अजूनही सुमारे हजार सदस्यांना अर्ज मान्य झाल्याची माहिती मिळालेली नाही. दरम्यान, या कामासाठी केवळ तीनच कर्मचारी असल्याने विलंब होत आहे. इतर सर्व कामे थांबवून कर्मचाऱ्यांना सदस्यत्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. याशिवाय संगणकातील डेटा एंट्रीसाठी काही कॉलेजमधील शिकाऊ विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आता वेग येण्याची अपेक्षा आहे.

संपर्क व्यवस्था ठप्प

022–22660956 हा एशियाटिक सोसायटीचा संपर्क क्रमांक गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. बाहेरील व्यक्तींना चौकशी किंवा संपर्क साधण्यासाठी हा एकमेव क्रमांक आहे. मात्र तो बंद असल्याने अर्जदारांना माहिती घेण्यासाठी इतर कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही.

सहा महिन्यांपूर्वी मंत्रालयातील सचिव दर्जाच्या सनदी अधिकाऱ्याला एशियाटिकशी संपर्क साधायचा होता, पण संस्थेचा लँडलाइन फोन बंद असल्याने त्यांना राज्य ग्रंथालय महासंचालक कार्यालयाशी संपर्क करून तिथून संदेश पाठवावा लागला होता.एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष विस्पी बालापोरिया यांनी दूरध्वनी क्रमांक बंद असल्याचे मान्य केले. एमटीएमएलच्या सेवेत अडथळा आल्यामुळे हा क्रमांक बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र दोन शतकांचा इतिहास असलेल्या या संस्थेने पर्यायी संपर्क व्यवस्था का निर्माण केली नाही, हा एक मोठा प्रश्न आहे.

राजकीय वादाच्या ठिणग्या

एका राजकीय पक्षाच्या बँक खात्यातून अर्जांसाठीचे शुल्क भरल्याने संस्थेच्या नियमांचा भंग झाल्याचा आक्षेप पडताळणी समितीतील काही सदस्यांनी घेतला होता. मात्र संस्थेच्या नियमावलीत अशा प्रकारचे पैसे स्वीकारू नयेत अशी कोणतीही तरतूद नसल्यामुळे पैसे स्वीकारण्यास नकार देऊ शकत नसल्याचे अध्यक्ष विस्पी बालापोरिया यांनी स्पष्ट केले. तत्कालीन व्यवस्थापनाला भविष्यात राजकीय पक्षांचे लोक संस्थेत शिरकाव करतील असे वाटले नव्हते, त्यामुळे नियम तयार करण्याची गरज त्यांना वाटली नसावी. मात्र सध्या संस्थेत सुरू असलेली राजकीय चढाओढ ही संस्थेच्या हिताची नाही, असे त्यांनी सांगितले.

“15 ऑक्टोबरपूर्वी मी अर्ज भरला होता. अर्ज व्यवस्थित असल्याची खातरजमा उपस्थित कर्मचाऱ्याकडून करून घेतली. मात्र माझ्या अर्जाचे काय स्टेटस आहे याबाबत कोणतीही माहिती मला आजपर्यंत एशियाटिककडून मिळाली नाही.”
— समीर चवरकर, अर्जदार “सभासदत्वासाठी ज्यांनी व्यवस्थित अर्ज केले आहेत, त्यांनी दूरध्वनीची वाट पाहण्याऐवजी थेट एशियाटिकमध्ये येऊन वार्षिक शुल्क भरावे आणि आपले ओळखपत्र घ्यावे. ज्यांनी अर्ज अपूर्ण किंवा चुकीचे भरले आहेत, फक्त त्यांचेच अर्ज होल्डवर ठेवण्यात आले आहेत.”

— प्रो. विस्पी बालापोरिया, अध्यक्ष, एशियाटिक सोसायटी, मुंबई

Asiatic Society Mumbai
Premium| Asiatic Society Mumbai: एशियाटिक सोसायटीसारखी दोनशे वर्षांची परंपरा असणारी संस्था संकटात सापडली आहे. हा सांस्कृतिक वारसा वाचवण्यासाठी मुंबईकरांनी पुढे येणे गरजेचे

केतकर विरुद्ध सहस्त्रबुद्धे

दरम्यान, एशियाटिकच्या व्यवस्थापन समितीच्या एकूण 12 पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अध्यक्षपदासाठी जेष्ठ संपादक, माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर आणि भाजपचे माजी राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्यात लढत होणार आहे. चार उपाध्यक्ष पदांसाठी एकूण 14 उमेदवारी अर्ज आले आहेत. आज (ता. 30) अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लढतीचे चित्र गुरुवारी स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com