भारताला कणखर बनविण्यात अटलजींचा सिंहाचा वाटाः मुख्यमंत्री

पृर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आले
पृर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आले

वाडा (ठाणे): जगात भारताची कमजोर व गरीबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयीच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. त्यांनी अणुचाचणी घडवून भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले तसेच कारगिल विजय प्राप्त करून भारत कणखर व बलवान असल्याचे जगाला दाखवून दिल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी वाडा येथे बोलताना केले.

जनप्रिय स्मृती सेवा संस्था व शिक्षक संचलित शिक्षण संस्था वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या पृर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडवणीस पुढे म्हणाले, 'पोखरण अनुचाचणी होऊ नये यासाठी अमेरिका, फान्स, जर्मनी या सारख्या बलाढ्य देशांनी भारतावर दबाब आणण्याचा प्रयत्न केला. भारतावर प्रतिबंध लादण्याची धमकी देण्यात आली. मात्र या दबावाला न जुमानता अटलजींनी यशस्वी अणुचाचणी करून भारताची अणुसज्जता सिध्द केली. भारत पाकिस्तान संबंध सुधारावेत म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरूच राहिल्या पाकिस्तान कडून कारगील मध्ये युध्द छेडले त्याला जशासतसे उत्तर देऊन कारगील विजय संपादन करून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली.'

'अटलजी विरोधी पक्षात असताना त्यांनी युनायटेड नेशन मध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले व तिथे देशाची प्रभावी बाजु मांडून राजकीय मतभेद बाजुला ठेवून देशहित सवोच्च मानून कार्य केले. त्यामुळे अटलजी राजकारणा पलिकडे जाऊन काम करणारे नेतृत्व होते यातून ते सिद्ध होत असल्याचा खास उल्लेख केला. अटलजी कवी मनाचे संवेदनशील राजकारणी होते. तेवढेच ते कणखर व कठोर निर्णय घेणारे पंतप्रधान म्हणून त्यांची इतिहासात ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून पाच लाख गावात रस्ते तयार करून ग्रामीण व अतिदुर्गम भागाला जोडण्याचे महत्वाचे काम केले. रस्त्याबरोबरच शिक्षण आरोग्य सेवाही या भागात पोहचून तेथील जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले,' असेही फडवणीस म्हणाले.

पालघर जिल्हा कुपोषणाच्या समस्येने नेहमीच चर्चेत राहिला आहे. मात्र, राज्य शासनाकडून या समस्ये बाबत प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा व श्रमजीवीचे नेते विवेक पंडित यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. आदिवासी विकास योजना आढावा समितीच्या अध्यक्षपदी विवेक पंडित यांची शासनाने नुकताच नियुक्ती केली असून, त्यांना राज्यमंत्री दर्जाही देण्यात आला आहे. त्याचा फायदाही कुपोषण निर्मुलनासाठी होईल, असा आशावादही त्यांनी बोलताना व्यक्त केला. तरूणांना व विद्यार्थांनी अटलजीचे विचार अंगिकारावेत हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे बोलताना फडवणीस यांनी सांगितले.

वाड्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात अश्वासीत करतील अशा अपेक्षेने आलेले नागरिक मात्र मुख्यमंत्र्यांनी काहीच नामोउल्लेख न केल्याने नागरिक नाराज होऊन परतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते ग्रामीण भागात विशेष काम करणा-या मान्यवरांचा अटल गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा,खासदार कपिल पाटील, खासदार राजेंद्र गावित, श्रमजिवी संघटनेचे नेते विवेक पंडित,आमदार शांताराम मोरे,भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार पास्कल धनारे, जनप्रिय स्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा, शिक्षक संचलित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश अरोरा, सचिव भरत जानेफळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्राचार्य नारायण फडके यांनी केले.

स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात यापूर्वी 26/11 हल्ल्यातील शहीदांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच आज अनावरण झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या पृर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात जनप्रिय स्मृती सेवा संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांच्या प्रयत्नातून झाले आहे.अटलजीचे हे स्मारक कायम प्रेरणा देणारे असेल अशी प्रतिक्रिया ओमप्रकाश शर्मा यांनी व्यक्त केली.

भाजप कार्यकर्त्यात नाराजी
मुख्यमंत्र्यांच्या या दौ-यामध्ये तालुका पातळीपासून जिल्हा पातळीवरील सर्व कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच काही उपस्थित कार्यकत्यानी मुख्यमंत्र्यांच्या स्वागत करण्याची इच्छा प्रगट केली असता संयोजकांनी व्यासपीठावर येण्यास मज्जाव केल्याने त्यांना अर्धा रस्त्यातून परतावे लागले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी,भाजपचे विभागीय चिटणीस कुंदन पाटील, तालुका कार्याध्यक्ष मंगेश पाटील, उपसभापती मेघना पाटील,तालुका अध्यक्ष संदीप पवार या प्रमुख पदाधिका-यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com