पालिकेत हजेरीचा घोळ सुरूच! आता 75 टक्के उपस्थितीचे आदेश

 पालिकेत हजेरीचा घोळ सुरूच! आता 75 टक्के उपस्थितीचे आदेश


मुंबई : कधी 5 टक्के, तर कधी 50 टक्के; कधी 100 टक्के, तर कधी 75 टक्के उपस्थितीचा घोळ महापालिका कार्यालयांत सुरू आहे. महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी 30 एप्रिलला 100 टक्के कर्मचाऱ्यांना हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग शक्य नसल्यामुळे शुक्रवारपासून (ता. 8) महापालिका कार्यालयांत 75 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर अत्यावश्क सेवा वगळता इतर विभागांतील 50 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जारी केल्यानंतर राज्य सरकारनेही मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण 5 टक्क्यांवर आणले. या काळात वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे महापालिका कर्मचारी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर 8 एप्रिलला आयुक्तांनी 50 टक्के हजेरी नसलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्याचे आदेश दिले. 

महापालिका प्रशासनाने 30 एप्रिलला 100 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होत नसल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व विभागांतील 75 टक्के कर्मचाऱ्यांना हजर राहाण्याचे आदेश आता जारी करण्यात आले आहेत.

कोव्हिडसाठी 25 टक्के कर्मचारी
अत्यावश्यक सेवा वगळता इतर विभागांतील 75 टक्के कर्मचाऱ्यांपैकी 25 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाशी संबंधित कामे दिली जाणार आहेत. त्यांच्यावर कोव्हिड रुग्णालये, क्वारंटाईन केंद्रे, प्रतिबंधित क्षेत्रांचे नियोजन अशा जबाबदाऱ्या दिल्या जातील.

घरीच राहा; पण रजा कापणार 
55 वर्षांवरील आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना महिनाभर कामावर न येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या रजा कापण्यात येतील. 55 वर्षांवरील सहायक अभियंते, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर यांनी कामावर हजर राहायचे आहे. त्यांना कोव्हिडशी संबंधित काम देण्यात येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com