सावधान! सायबर हल्ल्यांमध्ये दुपटीने वाढ; सतर्क राहण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मे 2020

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात सर्वच क्षेत्रांवर अनिष्ट परिणाम झाला असून, सायबर हल्लेही दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे कंपन्या व वैयक्तिक वापरकर्त्यांनीही अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञ करत आहेत. 

मुंबई : कोरोना व लॉकडाऊनच्या काळात सर्वच क्षेत्रांवर अनिष्ट परिणाम झाला असून, सायबर हल्लेही दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे कंपन्या व वैयक्तिक वापरकर्त्यांनीही अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञ करत आहेत. लॉकडाऊनच्या 40 दिवसांत पैसे चोरण्यासाठी सायबर हल्ले करण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले. सायबर हल्ल्यांचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांत दुप्पट वाढले आहे. बँकांचा तपशील, वैयक्तिक बँक खाती हॅक करण्याचे अनेक प्रयत्न झाले. काही दिवसांत हा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी ः सलाम 'त्यांच्या' कार्याला ! 'ते' सुद्धा करताय जीव धोक्यात घालून काम

त्यामुळे सर्वांनी इंटरनेट साक्षर होण्याची गरज आहे, असे इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष सोमानी यांनी सांगितले. या कंपनीतर्फे देशभरातील साडेतीनशे बँका, दोनशे कंपन्या व 135 सरकारी यंत्रणांची संगणकीय माहितीचे जतन व संरक्षण केले जाते.  यापुढेही हॅकर्सतर्फे वाढत्या संख्येने सायबर हल्ले होतील. इंटरनेट वापरातील धोके दहा ते शंभर पट वाढू शकतील. जवळपास प्रत्येक घरात आई-बाबांचा मोबाईल मुलांच्या हातात असतो. या मुलांनी अजाणतेपणी केलेली कृती हॅकर्सच्या फायद्याची ठरू शकते. त्यामुळे कोरोनासंदर्भात आपण जी पथ्ये पाळतो, ती इंटरनेट वापरतानाही पाळावीत, असा सल्ला त्यांनी दिला. 

मोठी बातमी ः मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, यंदा सतावणार नाही 'ही' कटकट

फेसबुकमधील माहिती सुरक्षित ठेवणारे फीचर्स कोणी वापरतही नाही. आम्ही इंटरनेट सुरक्षा-जागरुकता यासंदर्भात पाठवलेले व्हिडीओ कोणीही पाहत नाही. अनेक वापरकर्त्यांनी एकत्र व्हिडीओ कॉल करण्याचे एक लोकप्रिय अॅप असुरक्षित असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यावरून आपला तपशील अन्यत्र जाऊ शकतो, असे सोमानी म्हणाले. 

जागरूकतेचा अभाव
भारतात डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे; मात्र सुरक्षिततेबाबत जागरुकता वाढलेली नाही. इंटरनेट कसे वापरावे, याबाबत पुरेशी सावधानता अजूनही घेतली जात नाही. त्यामुळे हॅकर्सची हाव वाढेल आणि फसवणुकीचे प्रकारही वाढतील, असा इशारा पीयूष सोमानी यांनी दिला.

मोठी बातमी ः अखेर एपीएमसी मार्केट आठ दिवसांसाठी बंद

व्यवहारात दक्षता आवश्यक
अनेक अॅपमध्ये त्रिस्तरीय सिक्युरिटी फीचर्स नसतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार करण्यासाठी भीम अॅप किंवा बँकांची अॅप सर्वांत चांगली असतात. त्याखालोखाल सरकारी अॅप वापरा व त्यानंतर त्रयस्थ खासगी कंपन्यांच्या अॅपना उदा. पेटीएम, फोनपे) पसंती द्यावी. कोणत्याही लिंकवर क्लिक करून पैसे पाठवणे, आपला ओटीपी-पासवर्ड कोणालाही देणे अशा चुका अजिबात करू नयेत, अशी सूचना पीयूष सोमानी यांनी केली

 

इंटरनेट वापरताना अनोळखी साईट किंवा लिंक उघडू नयेत. अनावश्यक सर्फिंग-ब्राऊझिंग करू नये. निरुपयोगी माहिती संगणकात किंवा मोबाईलमध्ये भरू नये.
पीयूष सोमानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रा. लि.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rate of cyber attacks increased by double in india