कोरोनाच्या धास्तीने रक्ताचे नातेही थिटे

राजू परुळेकर
शनिवार, 21 मार्च 2020

कोरोना व्हायरसचा भारतातील प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. परदेशातील अनेक जण भारतात परत येत आहेत; मात्र कोरोनाच्या धास्तीने रक्‍ताचे नाते तुटत असल्याची घटना मुंबईत समोर आली आहे

मुंबई ः कोरोना व्हायरस चा भारतातील प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. परदेशातील अनेक जण भारतात परत येत आहेत; मात्र कोरोनाच्या धास्तीने रक्‍ताचे नाते तुटत असल्याची घटना मुंबईत समोर आली आहे. दुबईतून मुंबईला परतत असलेल्या सख्ख्या भाच्याला घरात न घेण्याचा इशाराच मावशीने दिला आहे. 

मोठी बातमी ः सावधान ! महाराष्ट्रात एका दिवसात वाढलेत ११ कोरोना रुग्ण; अजूनही बाहेर पडत असाल तर आत्ताच थांबा..

कांदिवलीतील एका सोसायटीत एक महिला आपल्या आई-वडिलांसोबत राहते. तिचा सख्खा भाचा शिक्षणासाठी आखाती देशातील बहरिन इथे राहतो. शिक्षणाचा व्हिसा संपल्याने तो भारतात परतणार आहे. त्याबाबत त्याने आपल्या मावशीला कळवले होते. ‘मावशी, माझा व्हिसा संपला आहे. माझे आई-वडील दोघे विदेशात आहेत. त्यामुळे मी तुझ्या घरी येतो.’ भाच्याचा फोन येताच कोरोनाच्या धसक्‍याने मावशीने त्याला माझ्या घरी अजिबात येऊ नकोस, असे बजावले. सदर महिला राहत असलेल्या सोसायटीत तब्बल २०० सदनिका आहेत. त्यामुळे दुबईवरून भाचा सोसायटीत आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे ‘तुला कोरोना असो वा नसो; परंतु माझ्या घरी येऊ नकोस. तू तुझ्या राहत्या घरी खारघर किंवा बंगळूरुला जा,’ असा सल्ला मावशीने दिला. 

मोठी बातमी ः #COVID19 : घाबरू नका! करोनाला निष्प्रभ करण्यासाठी प्रयत्न सुरू...

सध्या जगभरात आणीबाणीची परिस्थिती असल्याने बहरिन सरकारने भारतीयांचा व्हिसा वाढवून द्यायला हवा, असे या महिलेने म्हटले आहे. ‘मला स्वाईन फ्लूची लागण झाली होती, तेव्हा बाहेरगावी राहणाऱ्या माझ्या मुलालाही घरी येऊ दिले नव्हते. तसेच माझ्या या निर्णयाला सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे,’ असे त्या म्हणाल्या. 

मोठी बातमी ः आणखी एक गंभीर घटना, उल्हासनगरमधील 'ती' कोरोना पॉझिटिव्ह महिला गेली होती सत्संगला, तिथं होती १५०० लोकं

कोणताही नातेवाईक जर परदेशातून येत असल्यास त्याची वैद्यकीय चाचणी करावी आणि काही त्रास जाणवत असल्यास रुग्णालयात जावे. त्याचा सोसायटीत राहणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. सदर महिलेने घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे.
- झाईद नाझमी, सोसायटीचे सचिव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aunt refused to welcome her nephew from dubai