नियम धाब्यावर; मर्जीतील अधिकाऱ्यांना "क्रिम पोस्टिंग'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळख असलेल्या सिडकोच्या लेखा विभागात मर्जीतील अधिकाऱ्यांना 'क्रिम पोस्टिंग' देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्रासपणे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळख असलेल्या सिडकोच्या लेखा विभागात मर्जीतील अधिकाऱ्यांना 'क्रिम पोस्टिंग' (हवी त्या ठिकाणी बदली) देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्रासपणे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. पदोन्नती होऊनही प्रस्ताव विभागातील चार अधिकाऱ्यांना सहायक लेखा विभाग अधिकारी पदाचा कारभार न देता आधीपासून सहायक वसाहत अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या राजेंद्र देशमुख यांच्याकडे गेल्या दीड वर्षापासून अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. भविष्यनिर्वाह निधी विभागात कार्यरत असणाऱ्या लेखापाल के. आर. भगत यांना लेखा विमानतळ विभागाचीही जबाबदारी सोपवल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. 

ही बातमी वाचली का? निवडणूक आयोगाचा एक निर्णय, अन्‌ राजकारण्यांच्या स्वप्नांवर पाणी! 

नवी मुंबई शहर वसवल्यानंतर आता सिडकोने उलवे, द्रोणागिरी, खारघर, तळोजा, रोडपाली हे नोड विकसित करायला सुरुवात केली. तसेच विमानतळ, मेट्रो रेल्वे, गृहप्रकल्प आदी हजारो कोटी रुपयांची विकासकामे वेगात सुरू आहेत. या कामांची देयके लेखा विभागातून अदा केली जात असल्यामुळे सध्या लेखा विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच चलती आहे. बिले अदा केल्यावर मिळणाऱ्या बिदागीत आपला वाटा असावा, याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मर्जीतील अधिकाऱ्यांकडे कारभार सोपवला जात आहे. सहायक लेखा अधिकारी म्हणून प्रदीप देशमुख यांची 2018 डिसेंबरला निवृत्ती झाल्यानंतर त्यांच्या जागेवर पदोन्नती झालेले 4 सहायक लेखा अधिकारी असतानाही दुसऱ्या विभागातील वसाहत अधिकारी राजेंद्र देशमुख यांना सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा कारभार वरिष्ठ लेखा अधिकारी संजय कोळी यांनी दिला आहे. पदोन्नती झालेले चार अधिकारी असतानाही कोळी यांनी देशमुख यांना अतिरिक्त कारभार सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत दिल्यामुळे कोळींविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच लेखापाल एस. जी. गुजर यांच्या जागेवर मोरेश्‍वर कोळी यांची नेरूळ विभाग कार्यालयात बदली झाली होती. मात्र, बदलीच्या जागी नियुक्त न होता कोळी यांची जेव्हा पनवेल विभागाच्या कळंबोली कार्यालयासारख्या क्रिम पिोंस्टंगवर बदली झाली, तेव्हा कोळी यांनी पदाचा कारभार स्वीकारला. 

ही बातमी वाचली का? ...आता नवी मुंबई महापालिकेतही पाच दिवसांचा आठवडा

सिडकोच्या कर्मचाऱ्यांवर जर अन्याय होत असेल, तर त्यांनी सिडकोच्या कर्मचारी युनियनकडे जावे. कोणाला काय जबाबदारी द्यायची आणि कोणाला नाही, हा अंतर्गत प्रश्‍न आहे. 
- चंद्रशेखर बिवलकर, मुख्य लेखा अधिकारी 

ही बातमी वाचली का? बेलापूर खाडीकिनारील आगीतून संशयाचा धूर

अद्याप हे प्रकरण माझ्याकडे आलेले नाही. मात्र कर्मचाऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क करायला हवा. कर्मचाऱ्यांना नक्की न्याय मिळेल. 
- प्रशांत नारनवरे, सह-व्यवस्थापकीय संचालक, सिडको. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: avoiding Posting the rules, posting to CIDCO officials