बेलापूर खाडीकिनारील आगीतून संशयाचा धूर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

बेलापूर येथील खाडीकिनारी असलेल्या खारफुटीत बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली होती. या घटनेची तक्रार स्थानिकांनी वन विभागाच्या हेल्पलाईनवर; तसेच पोलिसात नोंदवली. मात्र, दरवर्षी एकाच ठिकाणच्या खारफुटीत आग लागत असल्याने ती जाणूनबुजून लावली जात असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

नवी मुंबई : बेलापूर येथील खाडीकिनारी बुधवारी (उरण उड्डाणपुलाखाली उलवेच्या दिशेने असलेली) असलेल्या खारफुटीत रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली होती. या घटनेची तक्रार स्थानिकांनी वन विभागाच्या हेल्पलाईनवर; तसेच पोलिसात नोंदवली. मात्र, दरवर्षी एकाच ठिकाणच्या खारफुटीत आग लागत असल्याने ती जाणूनबुजून लावली जात असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

ही बातमी वाचली का? भिवंडीतील एमआयएमची सभा रद्द

उलवे खाडीजवळच्या हेलिपॅडजवळ रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली. जवळपास दीड तासाने ही आग विझली. मात्र, ती कोणी विझवली याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावण्यात आल्याचा अंदाज येथील स्थानिकांनी व्यक्त केला. खारफुटी नष्ट करून जागा वापरण्यायोग्य बनवण्याकरिता आग लावली जात असल्याचा संशयही स्थानिक व्यक्त करत आहेत. याबाबत तक्रार नोंदवलेल्या व्यक्तीने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, शहरात ठिकठिकाणी विकासाच्या नावाखाली खारफुटी पाणथळ नष्ट केल्या जात आहेत. उरण उड्डाणपुलाला लागून असलेल्या या खाडीकिनारी दाट खारफुटी आहे. तेथे हेलिपॅडसाठीही काही वर्षांपूर्वी खारफुटी नष्ट करण्यात आली होती. अधून-मधून या परिसरात आग लागलेली दिसते. आता देखील जागा बळकावण्यासाठीच आग लावण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समजते. 

ही बातमी वाचली का? नवी मुंबईत विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त

2018 पासून आगीचे सत्र 
हेलिपॅडजवळ असलेल्या खारफुटीत आग लागण्याचे सत्र 2018 पासून सुरू आहे. 2018 मध्ये देखील जवळपास 3 ते 4 वेळा येथे आग लागली होती. 2019 मध्येदेखील याच ठिकाणी 3 वेळा आग लागली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire on Belapur Bay navi mumbai