शहापुरातील जैवविविधता केंद्र उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत; लाखोंचा खर्च वाया जाण्याची भीती 

शहापुरातील जैवविविधता केंद्र उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत; लाखोंचा खर्च वाया जाण्याची भीती 

खर्डी : शहापूर तालुक्‍यातील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून 2015-16 या आर्थिक वर्षात सामाजिक वनीकरणातंर्गत वन व वनेतर जमिनीवर स्व. उत्तमराव पाटील वन उद्यानाची निर्मिती करण्यात आली. मात्र, 5 वर्षे झाली तरी हे उद्यान नागरिकांसाठी खुले न केल्याने या केंद्रावर झालेला लाखो रुपयांचा खर्च मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. सामाजिक वनीकरण विभागाने हे उद्यान पूर्ण केल्यावर प्रादेशिक वनविभागाच्या ताब्यात न दिल्याने उद्यान ओस पडले आहे. या उद्यानाच्या तांत्रिक अडचणी सोडवून ते पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी होत आहे. 

राज्य सरकारच्या वन विभागाने प्रत्येक जिल्ह्यात स्व.उत्तमराव पाटील निसर्ग संरक्षण व जैवविविधता उद्यान योजनेंतर्गत विविध वनांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील शहापुरात पहिले जैवविविधता उद्यान 2019 मध्ये उभारण्यात आले आहे.

शहापूर वनपरिक्षेत्र हद्दीतील मुंबई-नाशिक महामार्गालगत पेंढरघोळ नजीकच्या कानविंदे गुरचरणमध्ये 12.10 हेक्‍टरमध्ये हे उद्यान उभारण्यात आले असून, उद्यानात 12 राशींच्या पंचांगाकृती नक्षत्रवनाची उभारणी करण्यात आली आहे. या इको-फ्रेण्डली उद्यानात स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड करून त्यांचे राशीप्रमाणे नामकरण केले आहे. 

संचालक फाले, वनपरिक्षेत्र तथा लागवड अधिकारी पी. आर. बागडे व सहा. लागवड अधिकारी वेहले यांनी उद्यानाची मांडणी केली आहे. या माध्यमातून अल्पावधीतच पर्यटकांना निसर्गसंपत्तीचे दर्शन होणार होते. या उद्यानाच्या माध्यमातून फळवन, चंपकवन, कदंबवन, अशोकवन, आम्रवन, जंबुवन, वंशवन, मदनवृक्ष वन, चरक वन, लता वन, सारिका वन, मृगसंचार वन, अतिथीवन यासारखी विविध प्रकारची उपवने निर्माण केली आहेत.

याठिकाणी मुलांसाठी मनोरंजन खेळणी, ज्येष्ठ नागरिकांना विश्रांती व फिरण्यासाठी निसर्ग पायवाटा आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्‌ घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले हे उद्यात तात्काळ खुले करावे, अशी मागणी होत आहे. 

हे उद्यान पूर्ण झाले असून वनविभागाच्या प्रादेशिक विभागाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ते पर्यटकांसाठी प्रादेशिक वनविभागाच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात येईल. 
- संग्राम जाधव, वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण, शहापूर 

"हे उद्यान ज्यावेळी पूर्णत्वास नेले त्याचवेळी सामाजिक वनीकरण विभागाने वनव्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केले असते तर पर्यटनाला चालना मिळून येणाऱ्या उत्पन्नातून या उद्यानाची देखभाल दुरुस्ती झाली असती. पर्यायाने उद्यानाला अशी अवकळा येण्याची वेळ आली नसती. 
- पांडुरंग बरोरा, माजी आमदार 

--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com