शिवसेना विसरली "आरेला का रे'? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

आरे वसाहतीमधील वादग्रस्त वृक्षतोडीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यामुळे "आरेला का रे' करणारी शिवसेना ते प्रकरण विसरली की काय, अशी चर्चा सुरू आहे. 

मुंबई : महापालिकेतील गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. आरे वसाहतीमधील वादग्रस्त वृक्षतोडीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यामुळे "आरेला का रे' करणारी शिवसेना ते प्रकरण विसरली की काय, अशी चर्चा सुरू आहे. 
एमएमआरडीएने (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे वसाहतीमधील 2200 झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वृक्ष प्राधिकरण समितीकडे पाठवला होता. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा विरोध असल्याने हा प्रस्ताव दोन वर्षे मंजूर करण्यात आला नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही संघटनांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उद्यान आणि वृक्ष अधिकाऱ्यांनी एमएमआरडीएला झाडे तोडण्याची परवानगी दिली. 

ही बातमी वाचा ः रडण्याचा आवाज आला म्हणून ते धावले...
त्यानुसार एका रात्रीत दोन हजारांहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेने "आपले सरकार आले तर आरेमधील मेट्रो कारशेडचे काम बंद करू', असे वचन दिले. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आरे वसाहतीमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली; परंतु आरे वसाहतीमधील झाडांच्या कत्तलीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा महापौरांनी केली. त्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान 
2018-19 चा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार नऊ जणांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट गुणवंत अधिकारी म्हणून उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, उत्कृष्ट कर्मचारी म्हणून आर उत्तर विभागाच्या परिचारिका पूजा नाणोसकर, बाजार निरीक्षणचे धर्मा कन्हीराम राठोड, नायर रुग्णालयाचे मुख्य लिपिक नरेश अनंत नाईक यांची निवड झाली आहे. उत्कृष्ट कामगार म्हणून देवनार पशुवधगृहाचे अशोक पांडुरंग ससाणे, जी उत्तर विभागाचे रोड रोलर स्वच्छक मुल्लाजी रफिक अब्दुल कादिर व नायर रुग्णालयातील हमाल प्रवीण परशुराम आडिवरेकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असलेले हे पुरस्कार फेब्रुवारीत प्रदान केले जातील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thackeray Award for the officer responsible for the cutting of trees