esakal | हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्लांटच्या उभारणीस सुरूवात

बोलून बातमी शोधा

Oxygen plant
हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्लांटच्या उभारणीस सुरूवात
sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे 14 प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होतील, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा: महावितरण कंपनीची आर्थिक घडी विस्कटली, ग्राहकांनी थकवले 693 कोटी

हवेतून ऑक्सिजन शोषून त्यातून शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना पुरविण्यात येतो. साधारणता एका प्लांटमधून दररोज सुमारे 2 टन (960 एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे 200 ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा: झोपडपट्टी आणि इमारतीत कशी आहे रोगप्रतिकार शक्ती, जाणून घ्या

मुंबई महानगर क्षेत्रातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रात 3, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येकी 2 तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्लांट उभारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी संस्थांची निवड करून त्यांना कार्यादेशही देण्यात आला. पुढील काही दिवसांमध्ये ते कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा नगरविकास मंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

सध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यातही ऑक्सिजनची गरज भासल्यास या प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन त्यासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही दिवसाला एक ते दीड टन ऑक्सिजन निर्मिती करणारे पाच ते सहा प्लांट उभारण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा: ''...मग आम्हाला उन्हाळी सुट्टी द्या'', शिक्षकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी