'मैं तो मंत्री नहीं था, फिर भी मेरा टिकट क्यों काटा?'; भाजप नेत्याचा उद्विग्न सवाल!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंडखोरी करू नये, म्हणून हा सगळा बंदोबस्त असल्याचे ते समर्थकांना सांगत आहेत. 

मुंबई : 'तावडे, बावनकुळे, खडसे मंत्री थे. मै तो मंत्री नहीं था. कितने सालों से पार्टीका वफादार बनके काम कर रहा हूँ. फिर भी मेरा टिकट क्यों काटा?' असा उद्विग्न सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी उपस्थित केला आहे.

चारवेळेस कुलाबा या मतदारसंघातून भाजपची पताका फडकवणाऱ्या राज पुरोहित यांना यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य राहुल नार्वेकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. नार्वेकर हे विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. 

कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला विमनस्क अवस्थेत होऊन राज पुरोहित सवाल करत आहेत. भाजपचा मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली. सतत कार्यतत्पर आमदार म्हणूनच ते परिचित आहेत. गोपिनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ते पक्षात ओळखले जातात. 

सुरूवातीपासूनच पक्षात काम करूनही यावेळी उमेदवारी नाकारल्याचे दु:ख त्यांना लपवता येत नाहीय. उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंडखोरी करू नये, म्हणून हा सगळा बंदोबस्त असल्याचे ते समर्थकांना सांगत आहेत. 

पंधरा वर्षानंतर भाजपचे सरकार आले. मला मंत्री केले नाही. मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही, असे सांगताना पुरोहित भावूक होतात.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : मतदारसंघ 21 अन् उमेदवार 373!

- Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील म्हणतात, 'मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय करून निवडणूक लढवतोय'

- वाहनचालकांनो, कागदपत्रांऐवजी पोलिसांना दाखवा क्यू-आर कोड!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharatiya Janata Party MLA Raj Purohit raised a serious question for neglecting him from Maharashtra Vidhansabha 2019