कोरोनाच्या धोक्यानंतरही ...'या' रुग्णालयात बायोमेट्रिकची सक्ती!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

कोरोना संसर्गाच्या धास्तीने काही राज्यांनी सरकारी आणि खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीतून तात्पुरती सूट दिली आहे; परंतु मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील कोरोना केंद्रातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे.

मुंबई : कोरोना संसर्गाच्या धास्तीने काही राज्यांनी सरकारी आणि खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीतून तात्पुरती सूट दिली आहे; परंतु मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील कोरोना केंद्रातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे संसर्गाची शक्‍यता असल्याने कर्मचारी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

ही बातमी वाचली का? कोरोनाबाबत अफवा पसरवताय? मग भोगा 'ही' शिक्षा! 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात मुंबईतील चार बाधितांवर उपचार सुरू आहेत. तेथील ओपीडीमध्ये तपासणी करून घेण्यासाठी संशयित रुग्णांच्या रांगा लागत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी महापालिका स्वच्छता राखण्याचे आवाहन करत असली, तरी कोरोना कक्षातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीची सक्ती केली जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना जीव धोक्‍यात घालून कामावर यावे लागत आहे. 

ही बातमी वाचली का? खालुबाज्याने दणालली ही गावे

याआधी महावितरण, मुंबई विद्यापीठ आणि सीईटी सेल आदी आस्थापनांनी बायोमेट्रिक हजेरीवर बंदी घातली आहे; परंतु कोरोना विलगीकरण कक्ष आणि राज्यातील तीन प्रयोगशाळांपैकी एक प्रयोगशाळा असल्याने कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांची गर्दी होत असूनही महापालिकेने कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीतून सूट दिलेली नाही. त्यामुळे रुग्णांशी सतत संपर्क येत असलेले डॉक्‍टर, आरोग्य सेवक आणि इतर कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची शक्‍यता वाढली आहे. हा धोका टाळण्यासाठी काही दिवस बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद करण्याची गरज कर्मचारी दबक्‍या आवाजात व्यक्त करत आहेत.

ही बातमी वाचली का? सरोगसी म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या...

कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या तपासणीसाठी येणाऱ्या बहुतेक रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. रुग्णांचा कर्मचाऱ्यांशी थेट संपर्क येत नाही. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची आवश्‍यकता वाटत नाही.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका.

रुग्णालयाचे कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. खबरदारी घेतली जात असली, तरी कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून बायोमेट्रिक हजेरी काही काळ स्थगित करणे गरजेचे आहे.
- रमेश जाधव, कामगार नेते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biometric attendance compulsion at Kasturba Hospital of Mumbai Municipal Corporation