
ठाणे : मागील अडीच ते तीन वर्षांपासून ठाणे महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. या प्रशासकीय राजवटीत पालिका प्रशासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपसह अजित पवार गटाला स्थानचं दिले जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे या दोन्ही घटक पक्षांच्या नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या आडमुठ्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथेला फाटा देत केवळ एकाच पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले जात असल्याचे सांगत ही बाब दुर्दैवी असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून म्हटले जात आहे.