ठाकरे सरकारच्या मंत्र्याविरोधात 'भाजप'ने थोपटले दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit Somaiya

किरीट सोमय्या यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

ठाकरे सरकारच्या मंत्र्याविरोधात 'भाजप'ने थोपटले दंड

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे (MVA Govt) सरकार आल्यानंतर आतापर्यंत या मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांवर आरोप करण्यात आले. शिवसेनेचे संजय राठोड (Shivsena Sanjay Rathod) आणि राष्ट्रवादीचे अनिल देशमुख (NCP Anil Deshmukh) यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने त्यांना राजीनामा (Resign) देण्याची वेळ आली. तशातच आता भाजपने (BJP) आता ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांविरोधात दंड थोपटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनिल परब (Anil Parab) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचसंबंधी आज भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. (BJP delegation Kirit Somaiya alleges Shivsena Anil Parab of Forgery Illegal Construction)

हेही वाचा: सेलिब्रिटींच्या लसीकरणावरुन आदित्य ठाकरेंवर मोठा आरोप

दुपारी १२ च्या भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेणार आहे, असं किरीट सोमय्या यांनी आधीच ट्वीट करून कळवलं होतं. त्यानुसार किरीट सोमय्या, खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) आणि आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी राजभवनात राज्यपाल यांची भेट घेतली. राज्याचे मंत्री अनिल परब यांनी तब्बल १० कोटींचे साई रिसॉर्ट दापोलीमध्ये उभारले आहे असा आरोप सोमय्या काही दिवसांपासून करत आहेत. त्यामुळे अनिल परब यांच्याविरोधात फसवणूक आणि बेकायदेशीर बांधकाम या दोन गोष्टींसाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली.

हेही वाचा: आता अनिल परबांचाही नंबर लागणार- किरीट सोमय्या

"अनिल परब यांनी फसवणूक केली आहे. त्यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे. राजपाल कोश्यारी यांनी आम्हाला या प्रकरणाबाबत आश्वासन दिलं आहे. परब यांनी वाळू असलेल्या जागेत रिसोर्ट बांधलाच कसा? तशी परवानगी कोणाकडून मिळाली? या प्रकरणाची SIT म्हणजेच विशेष तपास टीमकडून चौकशी केली जावी, अशी मागणी आम्ही केली आहे. तसेच, सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विश्वासू (Right Hand) असलेल्या अनिल परब यांच्या त्या कामाची पाहणी करून त्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांचं निलंबन केलं पाहिजे", अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

हेही वाचा: डॅडींच्या 'दगडी चाळी'वर लवकरच पडणार हातोडा!

नक्की काय आहे प्रकरण...

अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी दापोलीमध्ये कोट्यवधी रुपयांची जागा घेतली असून माहिती अधिकार कायद्यान्वये आपण याबाबतची माहिती मिळविली आहे आणि लवकरच याचा आपण लवकरच गौप्यस्फोट करणार आहोत, अशी माहिती भाजप नेते सोमय्या यांनी चार दिवसांपूर्वी दिली होती. "रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी २०२१ मध्ये स्वत:च्या नावाने या जमिनीचा साठे करार केला आहे, मात्र तो रजिस्टर केलेला नाही. डिसेंबर २०२० मध्ये ती जागा त्यांनी अंतर्गतरित्या त्यांचे भागीदार सदा कदम यांना विकली, असे दाखविण्यात आले. त्यामुळे कागदोपत्री अनिल परब यांनी जागा खरेदी केली असे दिसत नाही. त्या जागेवर अनिल परब आणि त्यांचे भागीदार सदानंद कदम यांनी रिसॉर्ट उभे केले आहे. तेथे जाण्यासाठी वनविभागाच्या जमिनीतून रस्ता काढला आहे. त्यासाठी परब यांनी पदाचा गैरवापर केला आहे", असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

loading image
go to top