esakal | "अशा लोकांना हुतात्मा चौकात दिवसभर उन्हात बसवा"

बोलून बातमी शोधा

Hutatma-Chowk

'त्यावेळीच मुख्यमंत्र्यांना हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याचा अधिकार मिळेल'

"अशा लोकांना हुतात्मा चौकात दिवसभर उन्हात बसवा"

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या 106 जणांच्या वारसांना घरे देण्याबाबत निर्णय न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना हुतात्मा चौकात दिवसभर थेट उन्हात बसवा आणि या प्रस्तावावर विचार करायला लावा, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे नगरसेवक अभिजीत सामंत यांनी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी ही सूचना केली. त्यांना उन्हात बसवलं तर अधिकाऱ्यांना सुबुद्धी सुचेल अन्यथा आपणच पुढाकार घेऊन हुतात्म्यांच्या वारसांना सदनिका द्याव्यात. तरच या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याचा नैतिक अधिकार आपल्याला मिळेल, अशा शब्दात सामंत यांनी ठाकरे यांच्यावरही टीका केली.

हेही वाचा: लसीकरण तीन दिवस बंद, केंद्रावर गर्दी करु नये; पालिकेचं आवाहन

हुतात्म्यांच्या वारसांना घरे मिळावीत यासाठी सामंत पहिल्यापासून आग्रही आहेत. गेली अनेक वर्षे हा विषय महापालिकेच्या विधी समितीत आणि सर्वसाधारण सभेत मांडूनही या संदर्भात प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. 'महापालिका प्रशासन या 106 हुतात्म्यांचे बलिदान विसरले आहे. किंबहुना प्रशासनाने त्याकडे मुद्दाम व उद्दामपणे दुर्लक्ष केले आहे', असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या विषयावर प्रशासनाने आतापर्यंत वेगवेगळे अभिप्राय दिले आहेत. अशा प्रकारची बाब महापालिकेच्या अधिकारकक्षेत येत नाही, त्यामुळे हे धोरण राज्य सरकारने ठरवावे, महापालिका असे धोरण ठरवू शकते, महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतल्यास त्याची अंमलबजावणी होऊ शकते, असे वेगवेगळे अभिप्राय प्रशासनाने या विषयावर दिल्याचेही सामंत यांनी दाखवून दिले आहे.

हेही वाचा: मुंबईकरांनो लक्ष द्या! लॉकडाउन गाईडलाईन्सचा 'हा' मेसेज करू नका फॉरवर्ड

आजपर्यंत मुंबईत अनेकदा अवैध बांधकामे क्षमापात्र झाल्यावर किंवा अनधिकृत झोपडीधारकांना सदनिका दिल्या गेल्या. मात्र या हुतात्म्यांच्या वारसांना उपेक्षित ठेवले गेले, असेही सामंत यांनी म्हटले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी प्रबोधनकार ठाकरे आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणारे सरकार सध्या महाराष्ट्रात आहे. तरीही महापालिका प्रशासन या प्रश्नावर चालढकल करीत आहे, ही खेदाची बाब आहे, असेही त्यांनी पत्रात सांगितले आहे.

हेही वाचा: 'ब्लेम गेम मध्ये जनतेचाच गेम होतोय', मनसेचा निशाणा

या प्रश्नावर विचार करून निर्णय घेण्याला जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांना एक दिवस हुतात्मा चौकात कोणत्याही मंडप किंवा इतर सोयींशिवाय उन्हात बसवावे. या अधिकाऱ्यांनी दिवसभर तेथे बसून संयुक्त महाराष्ट्र चळवळीबाबत त्या वेळच्या बातम्या, साहित्य यांचे वाचन करून आत्मपरिक्षण करून नंतर निर्णय घ्यावा. त्यामुळे तरी या अधिकाऱ्यांना सुबुद्धी सुचेल, अन्यथा आपणच पुढाकार घेऊन हुतात्म्यांच्या वारसांना सदनिका द्याव्यात. तरच या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याचा नैतिक अधिकार आपल्याला मिळेल, असेही सामंत यांनी सुनावलं.

(संपादन- विराज भागवत)