esakal | "मग तेव्हा काय चपात्या भाजत होतात काय?"; चंद्रकांतदादा बरसले

बोलून बातमी शोधा

Chandrakant-Patil-BJP

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील एक मुद्दा चंद्रकांत पाटील यांनी अजिबातच रूचला नाही

"मग तेव्हा काय चपात्या भाजत होतात काय?"; चंद्रकांतदादा बरसले

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्याला उद्देशून केलेल्या संवादात ऑक्सिजन, रेमडेसीवर, कोरोना लस या विषयांंवर भाष्य केलं. लसींसाठी लागणाऱ्या सहा हजार कोटींचा चेक तयार असून एकरकमी चेकने लसी घ्यायला तयार असल्याचं सांगितलं. तसंच राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार, अशी भविष्यवाणी सहा महिने आधीच केली असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. "राज्याकडे इतके पैसे असतील तर त्यांनी आधी अंसघटित कामगार वर्गाला मदत द्यावी. सध्या सर्वच जबाबदाऱ्या केंद्रावर ढकलल्या जात आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल, तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार? कोरोनाची दुसरी लाट येणार माहित होतं तर मग राज्यात आवश्यक त्या सुविधा का निर्माण केल्या गेल्या नाहीत? त्यावेळी तुम्ही काय चपात्या भाजत होतात का?", अशा शब्दात चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांवर बरसले.

हेही वाचा: "केंद्राच्या नावाने कांगावा अन् नुसताच शब्दांचा फुलोरा"

"कोरोनाची दुसरी लाट येणार ही अपेक्षा होती, असे मुख्यमंत्र्यांनी कबूल केले पण त्या लाटेचा सामना करण्यासाठी मधल्या पाच महिन्यात राज्य सरकारने काय तयारी केली हे सांगितले नाही. रुग्णालयांना जोडून ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत व ते काही दिवसात सुरू होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण हा तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर महिन्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली होती, तर मग एवढ्या दिवस काय चपात्या भाजत होतात का?", असा सवाल त्यांनी केला. "गेल्या पाच महिन्यातच असे ऑक्सिजन प्रकल्प उभे केले असते, तर आज त्यासाठी धावाधाव करावी लागली नसती. शुक्रवारच्या संबोधनात त्यांनी केंद्राने ऑक्सिजनचा पाचशे मेट्रिक टनांचा अधिक पुरवठा मंजूर केल्यामुळे राज्याची गरज जेमतेम भागते हे कबूल केले ते बरे झाले. राज्याला पंतप्रधानांच्या सूचनेनुसार रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला असल्याचेही त्यांनी मान्य केले हे सुद्धा चांगले झाले", असंही ते म्हणाले.

हेही वाचा: मुंबईकरांनो लक्ष द्या! लॉकडाउन गाईडलाईन्सचा 'हा' मेसेज करू नका फॉरवर्ड

"महाराष्ट्र राज्य १८ ते ४४ वयोगटासाठी बारा कोटी लशी एकरकमी विकत घेण्यास तयार आहे असे त्यांनी सांगितले. केंद्राने राज्य सरकारांना लशीची थेट खरेदी करण्याची परवानगी दिली असताना त्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या मागे लपण्याची गरज नव्हती. लशीच्या उत्पादन व पुरवठ्याला मर्यादा आहे. त्यामुळे जशी लस उपलब्ध होईल, तशी दिली जाईल, असे मुख्यमंत्री आता सांगतात आणि तरुणांना केवळ नोंदणीनंतर संदेश आल्यानंतरच लसीकरणाला जा असेही सांगतात. त्यांनी अशीच जाणीव ठेवून ४५ पेक्षा अधिकच्या वयाच्या नागरिकांच्या लसीकरणात शिस्त ठेवली असती तर गेले काही दिवस राज्यात जो लसीकरणाचा गोंधळ चालू आहे तो झाला नसता आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हात मनस्ताप सहन करावा लागला नसता", अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा: "अशा लोकांना हुतात्मा चौकात दिवसभर उन्हात बसवा"

"राज्यात लॉकडाऊन पंधरा दिवसांनी वाढविल्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जे रोजगाराचे नुकसान होणार आहे, ते ध्यानात घेता मुख्यमंत्री शुक्रवारी काही वाढीव पॅकेज जाहीर करतील, असं वाटलं होतं, पण त्यांनी निराशा केली. आधीच्या पॅकेजच्या अंमलबजावणीची त्यांनी दिलेली माहितीसुद्धा समाधानकारक नाही", असंही ते म्हणाले.