पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनो सर्वात मोठी बातमी, BMC म्हणतेय... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्यातच मुंबईत या व्हायरसचा प्रार्दुभाव जास्त आहे. महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी कामाची आखणी केली आहे.

मुंबई- सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्यातच मुंबईत या व्हायरसचा प्रार्दुभाव जास्त आहे. महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी कामाची आखणी केली आहे. त्यातूनच पूर्व उपनगरातल्या नालेसफाईचं काम आतापर्यंत 60 टक्के पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश ही स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले. महापालिकेनं ट्विटरवर ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. 

गुरुवारी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलारासू यांनी पूर्व उपनगरातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नालेसफाईसोबतच रस्त्यांची कामं 24 तास गतीनं पूर्ण करण्यात येत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावरील जंक्शनची कामं सुद्धा वेगानं पूर्ण करण्यात येत आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. यशवंत जाधव आणि वेलारासू यांनी शितल सिनेमा, संजयनगर पोलिस चौकी, कुर्ला पश्चिम, महेंद्र पार्क जंक्शन, घाटकोपर, आंबेवाडी जंक्शन, चेंबूरमधील आर. सी. मार्ग, इंदिरानगर याठिकाणांची गुरुवारी पाहणी केली. 

रेल्वेचे रिझर्वेशन काउंटर्स आजपासून सुरु, कोणत्या स्टेशनवर किती काउंटर सुरु? वाचा संपूर्ण यादी...
 

या पाहणीदरम्यान सायन रेल्वे स्थानक ते मुलुंड चेकनाकापर्यंत संपूर्ण 21 किमीच्या एलबीएस मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा जाधव यांनी आढावा घेतला. या मार्गावर येणारी अतिक्रमणे काढून हा मार्गाचं रुंदीकरण करण्यात येतंय. 100 फुटाच्या या मार्गावर पदपथाची कामं पूर्ण करुन हा रस्ता वेगानं पूर्ण करण्याच्या सूचना जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. 

यंदा मुंबई तुंबणार? 

गेल्या आठवड्यात मुंबईत यंदा तब्बल 291 ठिकाणी पाणी तुंबू शकते, असा अंदाज महापालिकेनं व्यक्त केला होता. हा अंदाज व्यक्त करत पालिकेनं त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे. पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या या ठिकाणांसह अन्य जागी पाणी उपसा करणारे सुमारे 350 हून अधिक पंप सज्ज ठेवण्यात येणारेत. कारण पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईतील नालेसफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. लॉकडाऊनच्या काळात कामगार मिळत नसल्यानं ही समस्या निर्माण झाली आहे.

शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील सर्वात 'मोठी' बातमी, सहकार विभागाने सुरु केली 'ही' प्रक्रिया

नवनिर्वाचित आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोरोनासोबतच पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. या बैठकीत पर्जन्य जलवाहिन्या विभाग, मलनि:सारण विभाग, विद्युत आणि देखभाल विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला कामाला लागण्याचे आदेश त्यांनी सर्वांना दिलेत. तसंच गेल्यावर्षी तुंबलेल्या ठिकाणी यंदा पाणी तुंबू नये, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असंही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. 

पंपांसाठी पालिका 70 कोटी खर्च करणार 

यंदा 291 ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता असल्यानं तुंबलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी 300 हून अधिक पंप सज्ज ठेवणार आहेत. तर पालिका यंदा पंपांसाठी 70 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. गेल्यावर्षी मुंबईत 225 ठिकाणी पाणी तुंबलं होतं. तेव्हा 298 पंप बसवण्यात आले होते.

BMC claims that 60 percent pre monsoon nala cleaning work is done


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC claims that 60 percent pre monsoon nala cleaning work is done