म्हणून नवी मुंबई पालिकेला मुंबईमुळे धास्ती...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

नवी मुंबई शहरातून मुंबई शहरात कामाला जाणाऱ्या नर्स, डॉक्टर, पोलिस, बँक अधिकारी, महापालिका कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था बृहन्मुंबई महापालिकेने करावी, अशी मागणी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी केली आहे.

नवी मुंबई : मुंबईत शहरात कामाला जाणाऱ्या अत्यवश्यक सेवेतील नागरिकांमुळे नवी मुंबई शहरात कोरोनाचा फैलाव झाला असल्याचे मत नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातून मुंबई शहरात कामाला जाणाऱ्या नर्स, डॉक्टर, पोलिस, बँक अधिकारी, महापालिका कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था बृहन्मुंबई महापालिकेने करावी, अशी मागणी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी केली आहे. जयवंत सुतार यांनी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मोठी बातमी ः मुंबईतील खासगी रुग्णालये सुरु; पण...

मार्चपासून ते एप्रिलपर्यंत शहरात 145 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे मुंबईत विविध ठिकाणी नोकरीला जात आहेत. नवी मुंबईतून मुंबईत कामाला जाणारे डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, वॉर्डबॉय, बँक अधिकारी अशा स्वरूपातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यापासून नवी मुंबई शहरातील तब्बल 55 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच मुंबईत आयटी उद्योगात काम करणारे 15 रुग्ण, मुंबईत विविध वाहनचालकांमधून झालेले 11 रुग्ण नवी मुंबईत सापडले आहेत. मुंबईत ये-जा करीत असल्यामुळे काही नागरिकांना कोरोनाची लागण होऊन त्यांच्यामार्फत नवी मुंबई शहरात कोरोनावाहकांची साखळी निर्माण झाली आहे.

महत्वाची बातमी ः कोरोनावरील अंतिम पर्याय 'हर्ड इम्युनीटी'चा ? पण, 'हर्ड इम्युनिटी' म्हणजे काय रे भाऊ?

कोरोनावाहकांच्या साखळीमुळे एकाच घरातील 14 ते 15 रुग्ण सापडले आहेत. नवी मुंबई हे मुंबईच्या शेजारचे शहर असल्यामुळे या शहरातून अत्यवश्यक सेवेसाठी कामाला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच हे सर्व कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील असल्यामुळे त्यांचे कामावर जाणेदेखील महत्त्वाचे आहे. मात्र हे नागरिक मुंबईतून नवी मुंबईत ये-जा करीत असल्याने नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची बृहन्मुंबई महापालिकेने राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करावी अशी मागणी सूतार यांनी केली आहे. 

शहरात सापडणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश कोरोना वाहकांची साखळी मुंबईतून आलेल्या नागरिकांमुळेच निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा कोरोनाबाधितांची संख्या थांबवण्यासाठी ही मागणी करण्यात येत आहे.
- जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc should take responsibility of peoples who came from navi mumbai