
'३१ मेपर्यंत दुकानावर मराठी पाट्या लावा, अन्यथा...', मुंबई महापालिकेचे निर्देश
मुंबई : गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुकाने आणि आस्थापनावर मराठीत फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. येत्या ३१ मेपर्यंत दुकानं, आस्थापना आणि कार्यालयांवरील नाम फलक मराठीत करा अन्यथा कारवाई केली जाईल, असे निर्देश मुंबई महापालिकेने (BMC) दिले आहेत.
हेही वाचा: मराठी पाट्या असाव्यात पण हिंदी इंग्रजी भाषेतील पाट्यां ना विरोध नको - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सुधारणा अधिनियम 2022 तील कलम 36 'क' (1) च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम 7 नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. या नियमाचं पालन न करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या की नाही? याबाबत पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. चौकशीदरम्यान मराठी पाटी लावण्यास नकार दिल्यास थेट न्यायालयात खटला दाखल केला जाईल. न्यायालयीन कारवाई नको असल्यास दंड भरावा लागेल. यामध्ये एका कामगारामागे एक हजार किंवा कायद्यातील दंडाच्या तरतुदीप्रमाणे दंड आकारण्यात येईल, असेही निर्देश मुंबई महापालिकेने दिले आहेत.
दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्या होत्या. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली जात होती. याबाबत राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अधिवेशनात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमात सुधारणा करण्यात आली. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेठ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकानावरील पाट्या मराठीतच लावाव्या लागणार आहेत. मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या इंग्रजी किंवा अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
Web Title: Bmc Warned For Marathi Plates On Shops Till 31 May
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..