मुंबई पालिका शोधणार कुष्ठरोग आणि क्षयरोगाचे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

कुष्ठरोग आणि क्षयरोगाचे संशयित रुग्ण शोधण्यासाठी मुंबई महापालिका सोमवारपासून (ता. १६) महामोहीम हाती घेणार आहे. २३ मार्चपर्यंत राबवल्या जाणाऱ्या मोहिमेत १४५ भागांमधील पाच लाख ८४ हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

मुंबई : कुष्ठरोग आणि क्षयरोगाचे संशयित रुग्ण शोधण्यासाठी मुंबई महापालिका सोमवारपासून (ता. १६) महामोहीम हाती घेणार आहे. २३ मार्चपर्यंत राबवल्या जाणाऱ्या मोहिमेत १४५ भागांमधील पाच लाख ८४ हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

हे वाचाच : कोरोनाबाबत अफवा पसरवताय? मग भोगा `ही` शिक्षा!

शहरातील क्षयरोगाचे प्रमाण जास्त असलेल्या १४५ भागांत नागरिकांची तपासणी करण्यासाठी ४४७ पथके तयार करण्यात आली आहेत. १६ ते २३ मार्चदरम्यान सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मोहीम राबवली जाईल. या वेळेत घरातील एखादी व्यक्ती बाहेर असल्यास इतर वेळीही तपासणी करता येईल. प्राथमिक तपासणीत आढळणाऱ्या संशयित क्षयरुग्णांच्या थुंकीची तपासणी व क्ष-किरण चाचणी करण्यात येणार आहे. थुंकीची तपासणी महापालिका किंवा सरकारी प्रयोगशाळेत करण्यात येणार असून, क्ष-किरण चाचणी महापालिकेने ठरवलेल्या खासगी केंद्रात करण्यात येईल, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

हे वाचलं का? : राजकीय निवडणुका कोरोनाच्या सावटाखाली?

क्षयरोगाची लक्षणे 

  • १४ दिवसांपेक्षा अधिक काळ ताप व खोकला.
  • सायंकाळी येणारा ताप 
  • थुंकीतून रक्त येणे 
  • वजन वेगाने कमी होणे

कुष्ठरोगाची लक्षणे 

  • त्वचेवर फिकट लालसर चट्टे, त्या ठिकाणी घाम न येणे
  • जाड, बधिर, तेलकट आणि चकाकणारी त्वचा
  • कानाच्या पाळ्या जाड व भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद न होणे
  • तळहाताला, तळपायाला मुंग्या येणे, बधीरपणा किंवा जखमा असणे 
  •  हात व पायांची बोटे वाकडी होणे
  •  हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे, हाता-पायांत अशक्तपणा जाणवणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC will search for leprosy and tuberculosis patients