ऑनलाईन शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार; शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना

तेजस वाघमारे
Tuesday, 18 August 2020

ऑनलाईन शिक्षणावर सध्या भर देण्यात येत आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शाळांमार्फत ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याची आवश्यकता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली. त्यानुसार ऑनलाईन अध्यापनाची गुणवत्ता वाढवण्याबाबत मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये अध्यापन करताना घ्यावयाची दक्षता, शैक्षणिक व अशैक्षणिक बाबी, अध्यापन करताना टाळावयाच्या गोष्टी, शिक्षकांकडून ऑनलाईन शिक्षणादरम्यान करावयाची कार्यवाही या बाबींचा समावेश आहे.

WHO नेही व्यक्त केली भीती, कोरोना संसर्गाचा दंत डॉक्टरांना सर्वाधिक धोका

ऑनलाईन शिक्षणावर सध्या भर देण्यात येत आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अध्यापनात येत असलेल्या अनेक अडचणींमुळे त्याचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे शिक्षकांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने ऑनलाईन अध्यापनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

अत्यंत महत्त्वाचं : यंदा थेट विसर्जनासाठी जाता येणार नाही, विसर्जनासाठीची नियमावली वाचून घ्या

यामध्ये शिक्षकांनी दिलेल्या वेळेत ऑनलाईन अध्यापनासाठी लॉगिन करणे, सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत करणे, चॅटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकाचे समाधान करणे, पुढील तासिकेबाबत थोडक्यात माहिती देणे, वार्षिक नियोजनाप्रमाणे पाठाची निवड करणे, आदर्श अध्यापन पद्धतीचा अवलंब करणे, प्रसुतीकरण करताना अ‍ॅनिमेशन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, व्हिडिओ क्लिप, मॉडेल, चार्ट, नकाशा चित्र यांचा वापर करणे, पुरेसे नेटवर्क असलेल्या ठिकाणापासून ऑनलाईन अध्यापन करणे, कॅमेरा स्थिर ठेवणे, विविध अ‍ॅप्लिकेशनचा वापर करणे अशा सूचना दिल्या आहेत.

सिडकोचे उपाध्यक्ष लोकेश चंद्र यांची बदली; कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली झाल्याने तर्कवितर्कांना उधाण

ऑनलाईन शिक्षणादरम्यान शिक्षकांनी टाळावयाच्या बाबींचीही माहिती त्यांना देण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्क्रिन शेअर करण्यास परवानगी देणे, बोलण्याची गती अधिक किंवा कमी असणे, विद्यार्थ्यांशी जास्त वेळ चर्चा करणे, वारंवार आपला चेहरा दाखवणे, शिक्षणादरम्यान व्यक्तिगत कॉल स्वीकारणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह अन्य अनावश्यक दृश्य दिसणे या गोष्टी टाळण्यात याव्या असेही सांगण्यात आले आहे. या गोष्टींचा अभ्यास करून ऑनलाईन अध्यापनाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सर्व शिक्षकांना दिल्या आहेत.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmcs education department gives guidelines for developing online education system