पूर`मिठी`तून मुंबईकरांना सुटका मिळणार!

समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

विहार, तुळशीच्या सांडव्याचे नदीत जाणारे पाणी अडवणार 

मुंबई : विहार, तुळशी तलावाच्या सांडव्यातून मिठी नदीत वाहून जाणारे पाणी अडविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मिठी नदीला येणाऱ्या पुरावर नियंत्रण ठेवता येणार आहे. हे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचा किंवा ऐरोली खाडीत सोडण्याचा पालिकेचा विचार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये तुळशी आणि विहार धरण भरल्यानंतर त्याच्या सांडव्यातील पाणी मिठी नदीत वाहून जाते. त्यातच मोठा पाऊस आणि समुद्राला 4 ते 4.5 मीटरहून अधिकची भरती असल्यास कुर्ला, शिव या परिसरात पाणी तुंबण्यास सुरू होते. त्यामुळे सांडव्याचे पाणी अडवून मिठी नदीतील पाण्याचे प्रमाण कमी करण्याचा विचार महापालिका करत आहे. 

हेही वाचा : बापरे! राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण, यामध्ये मुलींचं प्रमाण... 

तुळशी तलावातील सांडव्याचे पाणी विहार तलावात येते. त्यानंतर विहार तलावातून ते पाणी मिठी नदीत जाते. मिठी नदीत जाणारे पाणी अडवून ते भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचा विचार आहे. नंतर त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शहरात पिण्यासाठी वापरण्यात येईल. भांडुप शुद्धीकरण केंद्रात पाणी आणणे अवघड असेल तर, जलबोगादा बांधून हे पाणी ऐरोली खाडीत सोडण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे केला जाणार आहे. मिठी नदीत जाणारे सांडव्याचे पाणी अडविण्याच्या पर्यायांचा विचार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पालिकेच्या जलप्रकल्पाचे प्रमुख अभियंता शिरीष दीक्षित यांनी सांगितले.

हे पाणी अडवताना मिठी नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्याबाबतही या अहवालात विचार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मिठी नदीच्या परिसरात सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यात शुद्ध झालेले पाणी मिठी नदीत पाठविण्यात येणार आहे. या सर्वांचा विचार हा प्रकल्प अहवाल तयार करताना करण्यात येणार आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

हे वाचलं का? : लंडनच्या धर्तीवर आता #MumbaiEye ; आता आकाशातून पाहा संपूर्ण मुंबई

नेमके काय होते? 

 • जुलैच्या अखेरच्या महिन्यात किंवा ऑगस्टच्या मध्यापर्यंत विहार आणि तुळशी तलाव भरल्यावर अतिरिक्त पाणी मिठी नदीत वाहून येते. 
 • अशा वेळी मोठा पाऊस असल्यास तलावांमधून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढतेच. त्याचवेळी नदीत पावसाचे पाणीही जमा होते.  
 • याच काळात समुद्राला 4 मीटरहून अधिक उंचीची भरती असल्याने समुद्राचे पाणी मिठी नदीत कुर्लापर्यंत येते. 
 • अशा परिस्थितीत पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने कुर्ला, शिव परिसराचा भाग जलमय होतो. 
 • 2019 मध्ये चार वेळा मिठी नदीला पूर आला होता. त्यामुळे शिव, कुर्ला भागात पाणी साचले होते. 
 • त्यामुळे लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि शिव, कुर्ला स्थानकाचा परिसर जलमय होऊन रेल्वे तसेच रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. 
 • वांद्रे-कुर्ला संकुल बांधण्यापूर्वी हे पाणी त्या परिसरातील दलदलीत साचायचे. बीकेसी बांधताना मिठी नदीत येणारे समुद्राचे पाणी अडविण्यासाठी माहीमजवळ फ्लड गेट बांधण्याची शिफारस करण्यात आली होती; मात्र जागा नसल्याने असे फ्लड गेट बांधता आले नाही.

  हेही वाचा : उल्हासनगरमध्ये सैराट... भाऊजीला घातल्या गोळ्या​

  सांडव्याचे पाणी... 

 • मोठा पाऊस असल्यास दोन्ही तलावांमधून मिळून 7 हजार दशलक्ष लिटर पाणी मिठी नदीत वाहून जाते. -
 • शहराला साधारण दीड दिवस हे पाणी पिण्यासाठी पुरू शकेल. -
 • वर्षात साधारण सात दिवस प्रत्येकी 7 हजार दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी वाहून जाते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC's efforts to prevent flood