
शहापूर येथे राहणाऱ्या आठ वर्षीय मुलाने गिळलेला 2 रुपयाचा कॉईन यशस्वीरित्या काढण्यात केईएममधील डॉक्टरांना यश आले आहे.
मुंबई : शहापूर येथे राहणाऱ्या आठ वर्षीय मुलाने गिळलेला 2 रुपयाचा कॉईन यशस्वीरित्या काढण्यात केईएममधील डॉक्टरांना यश आले आहे. त्यामूळे, या मुलाला जीवदान मिळाले आहे. सध्या मुंबईसह राज्यात सर्वच ठिकाणी कोरोनावर उपचार केले जात आहेत. मात्र, अशी ही काही रुग्णालये जिथे कोरोनावर उपचार केले जात नसुनही इतर रुग्णांवर उपचार नाकारले जात आहेत. प्रेम वानखेडे असे या 8 वर्षांच्या मुलाचे नाव असुन त्याने गिळलेला कॉईन अन्ननलिकेत जाऊन अडकला होता. या मुलाला तिथल्या स्थानिक रुग्णालयांनी उपचार देण्यासाठी वेगवेगळी कारणे देऊन नाकारले होते. तिथल्या डॉक्टरांनी थेट मुंबईतील केईएम रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
त्यानूसार, कुटुंबीयांनी पैसे जमा करत रुग्णवाहिकेची सोय केली आणि थेट मुंबई गाठली. शहापुरच्या परिसरातील राजीव गांधी मेडिकल रुग्णालय आणि आरजीएमसी मेडीकल रुग्णालय, शिवाजी रुग्णालयाने एंडोस्कोप नसल्याचं कारण देत ऑपरेशन नाकारलं होतं. त्यानंतर, 2 दिवसांपूर्वी मध्यरात्री 3 वाजता रुग्णवाहिका घेऊन वानखेडे कुटूंब केईएमला पोहोचलं.
भीषण ! मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, राज्यातील ६००० पोलिस विलगीकरणात..
या सर्व परिस्थितीत मुलाची तब्येत बिघडत चालली होती. कारण, मुलगा 12 तासांहून अधिक वेळ अन्न पाण्याविना होता. अजून काही वेळ त्याच्यावर उपचार झाले नसते तर त्याच्या जीवाला धोका होता. केईएम रुग्णालयात ही अनेक वॉर्ड हे कोरोना रुग्णांसाठी देण्यात आले आहेत. कान-नाक- घसा हा विभाग ही कोरोना रुग्णांसाठी देण्यात आला आहे. त्यामुळे, इथे ही फक्त आपातकालीन परिस्थितीतील रुग्ण घेतले जात आहेत. अश्यातच या मुलाला वॉर्डमध्ये बेड मिळणं ही कठीण झाले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्या मुलाला बेड मिळाला आणि त्याच दिवशी दुपारी 2.30 वाजता या मुलावर एंडोस्कोपी ने शस्त्रक्रिया करत 2 रुपयाचा कॉईन त्याच्या अन्ननलिकेतून काढण्यात आला.
नियमानुसार, शस्त्रक्रिया करण्याआधी या मुलाचा स्वाब घेण्यात आला. आज या मुलाच्या चाचणीचे रिपोर्ट येतील. जर, या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर ज्या डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली त्यांना क्वारंटाईन व्हावं लागेल असं रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मोठी बातमी - मुंबईकरांनो कोरोनासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, ही आहे मुंबईची परिस्थिती...
9 मिनिटांची यशस्वी शस्त्रक्रिया
2 दिवसांपूर्वी हा मुलगा रुग्णालयात दाखल झाला होता. शहापुरच्या रुग्णालयांनी त्या मुलावर उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर तो केईएममध्ये आला. त्याला बेड उपलब्ध करुन दिल्यानंतर तात्काळ त्याच्यावर शस्त्रक्रिया केली गेली. चार ते पाच डॉक्टरांनी मिळुन ही शस्त्रक्रिया केली गेली. या मुलाची प्रकृती ठिक असुन त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या मुलाचा स्वाब घेण्यात आला असुन त्याचा अहवाल आज येणार असुन तो पॉझिटिव्ह आला तर डॉक्टरांना क्वारंटाईन व्हावे लागेल. - डॉ. निलम साठे, इएनटी सर्जन, केईएम रुग्णालय
boy from shahapur gulped a 2 rupees coin admitted in shahapur