अरे बापरे सामाजिक न्याय भवनची इमारतच धोकादायक... कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका

अलिबाग : सामाजिक न्याय भवन इमारतीची दुरवस्था झाली आहे.
अलिबाग : सामाजिक न्याय भवन इमारतीची दुरवस्था झाली आहे.
Updated on

अलिबाग : कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गोंधळपाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीची अवस्था दयनीय झाली आहे. या भवनमध्ये काम करणारे कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. या इमारतीच्या अवस्थेबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने गेल्या सहा महिन्यांपासून दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महाड इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी अलिबागमधील गोंधळपाडा या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत बांधण्यात आली. या इमारतीच्या तळमजल्यावर मागासवर्गीय विकास महामंडळाची पाच कार्यालये आहेत. वरच्या मजल्यावर समाजकल्याण विभागाचे कार्यालय असून, या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे कार्यालय, सहायक आयुक्तांचे कार्यालय, प्रतीक्षालय आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर जात पडताळणी कार्यालय आहे. या ठिकाणी जात पडताळणी समितीचे अध्यक्ष, संशोधन अधिकारी यांच्या कार्यालयांसह कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कार्यालय आहे. तसेच जात पडताळणीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रतीक्षालय आहे. 

या इमारतीचा स्लॅब आता कोसळू लागला आहे. पावसाच्या पाण्याने भिंती ओल्या होऊ लागल्या आहेत. ज्या खांबावर ही इमारत उभी आहे, त्या खांबाची अवस्थाही बिकट झाली आहे. नादुरुस्त इमारतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने समाजकल्याण विभागाने बाटूच्या माध्यमातून इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. त्यांच्या अहवालानुसार इमारत धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेतली. एक समिती नेमून या इमारतीचा अहवाल सादर करण्यास सांगितला.

अधीक्षक अभियंता यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु, गेली सहा महिने उलटूनही या इमारतीच्या दुरवस्थेबाबत समितीने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे या इमारतीमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी, तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाड येथील इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी विद्यमान जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

नव्या कार्यालयाची प्रतीक्षा 
गोंधळपाडा येथील सामाजिक न्याय भवनच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने येथील कार्यालय अन्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय संबंधित कार्यालयाने घेतला आहे. मात्र, तशी जागा मिळत नसल्याने या भवनला नव्या कार्यालयाची प्रतीक्षा असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

सामाजिक न्याय भवनच्या इमारतीचे समितीद्वारे स्ट्रक्‍चरल ऑडिट करून त्याचा अहवाल लवकरच समिती सादर करणार आहे. 
- आर. एस. मोरे, कार्यकारी अभियंता 
सार्वजनिक बांधकाम विभाग 

(संपादन : उमा शिंदे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com