कोरोनामुक्त रुग्ण वाऱ्यावर; अनेक आजार बळावत असल्याने महामुंबईत चिंता 

सुजित गायकवाड  
Friday, 28 August 2020

कोरोनामुक्त अनेक रुग्णांना दीर्घकाळ थकवा, सतत निरुत्साह अशा समस्यांचा सामना करावा लागतो; तर फुफ्फुसाची क्षमता कमी होणे, रक्तात गुठळ्या होणे असे आजारही  बळावत आहे.

नवी मुंबई : कोरोनामुक्त अनेक रुग्णांना पुन्हा गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये दीर्घकाळ थकवा, फुप्फुसांची खालावलेली क्षमता, मानसिक ताण आदींचा समावेश आहे; परंतु अशा रुग्णांकडे महामुंबईतील सरकारी रुग्णालयांकडून दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे चौकशीही करण्यात येत नाही. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ चिंता व्यक्त करत असून भविष्यात गंभीर स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करत आहेत. 

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! महापालिकेकडून दहा टक्के पाणीकपात रद्द

कोरोनामुक्त अनेक रुग्णांना दीर्घकाळ थकवा, सतत निरुत्साह अशा समस्यांचा सामना करावा लागतो; तर फुफ्फुसाची क्षमता कमी होणे, रक्तात गुठळ्या होणे असे आजारही त्यांच्यात बळावतात. हिरानंदानी फोर्टीज रुग्णालयाच्या इंटर्नल मेडीसीन विभागाच्या संचालक डॉ. फराह इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुक्त झालेल्या 70 टक्के रुग्णांना अनेक दिवस थकवा जाणवतो. 60 टक्के रुग्णांमध्ये मानसिक ताण आणि 30 टक्के रुग्णांची फुफ्फुसाची क्षमता कमी झाले आहे. त्याकरीता हिरानंदानी फोर्टीज रुग्णालयातर्फे वाशीमध्ये पोस्ट कोव्हिड 19 पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. 

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी, नक्की वाचा

कोरोनामुक्त रुग्णांना वेगवेगळे आजार होत असल्याने त्यांना वेळीच उपचार केल्यास त्यांची यातून सुटका होऊ शकते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास वेगवेगळ्या आजारांची लाट येण्याची शक्‍यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. परंतु याबाबत अद्यापही महामुंबई क्षेत्रातील महापालिकांनी गांभीर्याने घेतलेले नाही. ठाणे, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि पनवेल आदींसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पालिका आणि महापालिकांनी तर अशा रुग्णांकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनामुक्त रुग्णाला घरी पाठवण्यात आल्यानंतर त्याच्याबरोबर दररोजचा संवाद होत नाही. त्यांच्यात होणारे शारीरिक होणारे बदल आणि त्रासाबाबत चौकशी करण्यात येत नाही. 

पुढील वर्षी बाप्पा येऊ शकणार नाही म्हणून इतिहासजमा होणाऱ्या वास्तूला कलाकुसरीने मांडण्याचा प्रयत्न

अशी काळजी घ्यावी 
कोरोनामुक्त होण्यासाठी अनेक रुग्णांना ऍन्टीबायोटीक्‍स गोळ्या आणि इन्जेक्‍शन दिले जाते. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. तज्ज्ञांच्या मते, उपचारानंतर घरी गेलेल्या रुग्णांनी सात दिवसांत काही आरोग्य चाचण्या करणे आवश्‍यक आहे. रुग्णांच्या प्रगतीचे मूल्यमापन, संभाव्या परिणामांची तीव्रता तपासणी करावी. रक्ताची चाचणी, ईसीजी, छातीचा एक्‍स-रे, यकृत प्रोफाईल आदी चाचण्या करणे आवश्‍यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात. 

मुंबईकर प्रचंड टेन्शनमध्ये, सर्व्हेतून मुंबईकरांबाबत धक्कादायक बाब झाली उघड

27 ऑगस्टपर्यंत कोरोनामुक्त रुग्ण 
रायगड जिल्हा - 21 हजार 791 
नवी मुंबई - 20 हजार 653 
पनवेल महापालिका - 9 हजार 656 

कोव्हिडमुक्त रुग्णांच्या शरीरात झालेल्या वेगवेगळ्या बदलांमुळे त्याला त्रास होतो. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबई सेव्हन हिल्स रुग्णालयात "पोस्ट कोव्हिड सेंटर' सुरू केले आहे. त्याच धर्तीवर महामुंबईतील रुग्णालयांतही अशी केंद्रे करणे आवश्‍यक आहे. याबाबत अभ्यास करण्यात येत असून अशी केंद्र करण्याचा विचार आहे. 
- डॉ. एन. रामास्वामी, संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान. 

संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many corona free patients facing new diseases as there is no care from health dept