नवी मुंबईत हजारो आंदोलकांची धरपकड; वाचा नेमकं काय झालं?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) मागे घ्यावा, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण थांबवावे, युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढलेल्या डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या (डीवायएफआय) आंदोलकांची नवी मुंबई पोलिसांनी धरपकड केली.

नवी मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) मागे घ्यावा, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण थांबवावे, युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढलेल्या डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या (डीवायएफआय) आंदोलकांची नवी मुंबई पोलिसांनी धरपकड केली. बेलापूरच्या आग्रोळी गावात मुक्कामाला असलेल्या या आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर करत पोलिस ठाण्यांमध्ये डांबवून ठेवले.

ही बातमी वाचली का? निवडणूक येताच 'त्यांची' घरोघरी मांदियाळी!

सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण, सरकारी नोकरभरतीवरील बंदी हटवणे, आदिवासींवर होणारे अन्याय, सीएए-एनआरसी कायदा मागे घ्यावा, अशा अनेक मागण्यांसाठी डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेतर्फे सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. संघटनेच्या महाराष्ट्र समितीमार्फत छेडण्यात आलेल्या या आंदोलनाला उरणच्या बीपीसीएल टर्मिनलमधून 16 फेब्रुवारीला सुरुवात झाली. आंदोलनात शेकडो कार्यकर्ते पायी सहभागी झाले होते. हळूहळू आंदोलकांची संख्या वाढत जात होती. मुंबईला जाण्यासाठी हे आंदोलक 18 फेब्रुवारीला सकाळी आग्रोळी गावातील कम्युनिस्ट पक्षाच्या ग्रंथालयात विश्रांतीला थांबले होते. विश्रांतीनंतर दुपारी आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवून पायी न जाता वाहनाने आंदोलनाला जाण्यास सांगितले; मात्र आंदोलक पायी जाण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत डांबले. दरम्यान, पोलिसांच्या झटापटीत चार आंदोलकांना किरकोळ जखमा झाल्या. 

ही बातमी वाचली का? कर्नाळा बॅंक घोटाळा; विवेक पाटलांसह 76 जणांवर गुन्हा दाखल 

आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न 
16 फेब्रुवारीला उरणपासून शांततेत मोर्चा सुरू केला. पोलिसांनी सुरूवातीला जासई गावाजवळ अटक करण्याचा प्रयत्न केला. अटक करून आम्हाला न्हावा-शेवा पोलिस ठाण्यात डांबले. त्यानंतर सायंकाळी सोडून दिल्यावर आम्ही पुन्हा पायी चालत वहाळ गावाच्या वेशीवर आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्‍ता सुरू असताना पोलिसांनी पुन्हा आमच्या सहकाऱ्यांना पकडून कळंबोली येथील मुख्यालयात तब्बल 6 तास ठेवले. तेथून कशीबशी येथून सुटका केल्यावर आम्ही सानपाड्याच्या दिशेने चालत निघालो. 17 फेब्रुवारीला सानपाड्याच्या दत्त मंदीरात आमचा मुक्काम होता. मात्र, त्याठिकाणी सुद्धा पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केल्याने आम्ही बेलापूरच्या आग्रोळी गावातील कॉम्रेड ग्रंथालयात मुक्कामाला आलो. मुक्कामानंतर मुंबईच्या दिशेने जाताना पोलिसांनी पुन्हा बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडीयाच्या महाराष्ट्र संघटनेचे सदस्य संजय कांबळे यांनी दिली.

ही बातमी वाचली का? कवितांनी फुलले हास्याचे कारंजे

आंदोलक पायी गेल्यास महामार्गावर वाहतूक कोंडी होईल म्हणून त्यांना वाहनाने जाण्यास सांगितले; मात्र ते पायी जात असल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. 
पंकड डहाणे, पोलिस उपायुक्त.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAA NRC oppose Thousands of protesters arrested in Navi Mumbai